फुकट्या प्रवाशांना सहा लाखांचा दंड
By Admin | Published: January 28, 2015 11:05 PM2015-01-28T23:05:58+5:302015-01-29T00:08:20+5:30
रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई : साडेतीन हजार जणांकडून वसुली; भिकारी, तृतीयपंथीयांचा समावेश--लोकमत विशेष
सदानंद औंधे - मिरज --मिरज रेल्वे सुरक्षा दलाने कोल्हापूर, मिरज, सांगली स्थानकात फुकटे प्रवासी, फेरीवाले, भिकारी, तृतीयपंथी व रेल्वे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३६५९ जणांकडून वर्षभरात ८ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. यापैकी २०४१ फुकटे प्रवासी असून, त्यांनी ५ लाख ९८ हजार रुपये दंड भरला आहे.
रेल्वे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना, भिकाऱ्यांना, फेरीवाल्यांना व तृतीयपंथीयांना पकडून प्रत्येक महिन्यातून दोनवेळा मिरजेत येणाऱ्या रेल्वेच्या फिरत्या न्यायालयासमोर हजर करण्यात येते. रेल्वे कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल शंभर ते एक हजारापर्यंत दंड किंवा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र तरीही रेल्वे कायद्याला न जुमानणाऱ्या प्रवासी, भिकारी, फेरीवाले, तृतीयपंथीयांच्या संख्येत वाढच होत आहे. २०१३ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाने वर्षभरात ६ लाख रुपये दंड वसूल केला होता; मात्र गतवर्षी दंडाच्या रकमेत वाढ होऊन ही रक्कम ८ लाख ६५ हजारांपर्यंत पोहोचली आहे.
कोल्हापूर, सांगली ते साताऱ्यापर्यंत रेल्वे सुरक्षा दलाने तिकीट तपासनीसांसोबत मोहीम राबवून वर्षभरात पॅसेंजर व एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या २०४१ फुकट्या प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ९८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. याशिवाय विनाकारण साखळी ओढून रेल्वेला विलंब करणारे, रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणारे, अनधिकृत तिकीट एजंट, फेरीवाले, भिकारी, तृतीयपंथी, रेल्वेत व रेल्वेस्थानकात अस्वच्छता करणारे, नियमबाह्य रेल्वेरुळ ओलांडणारे, रेल्वेच्या प्रवेशद्वारात लोंबकळत धोकादायक प्रवास करणारे, आरक्षित महिलांच्या डब्यातून प्रवास करणारे, रेल्वेत धूम्रपान करणारे, विनाकारण साखळी ओढून गाडी थांबविणारे व धावत्या रेल्वेत भांडण, मारामारी करणारे, रेल्वे सिग्नलची केबल तोडणारे, रेल्वेच्या प्रवेशद्वाराला ठोकरून नुकसान करणारे वाहनधारक अशा १६१८ जणांना पकडून त्यांच्याकडून २ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक गोकुळ सोनोनी यांनी दिली.
भिकाऱ्यांना पकडून होते फसगत
मिरज, सांगली व कोल्हापूरसह विविध स्थानकांत भिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेत प्रवाशांकडून भीक मागणाऱ्या तृतीयपंथीयांच्या टोळ्याही सक्रिय आहेत. मात्र वर्षभरात केवळ ४० भिकारी व तृतीयपंथीयांवरच कारवाई झाली आहे. भिकारी पकडले गेल्यावर दंड भरण्यास नकार देतात. दंड न भरणाऱ्यांना पुणे येथील कारागृहात पाठवावे लागते. पुणे येथील कारागृहात नेण्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा भिकाऱ्यांचा दंड भरून रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सुटका करून घेतात. भिकाऱ्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल होत नसल्याने भिकाऱ्यांना हुसकावून लावण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
नियम मोडणारे प्रवासीसंख्या दंड
विनातिकीट प्रवासी २०४१ ५,९८०००
रुळ ओलांडणारे ९२९ ९२,९००
अवैध फेरीवाले ३०६ १,०४,०००
साखळी ओढणारे ९ ३१००
भिकारी, तृतीयपंथी ४० १३,२००
अनधिकृत तिकीट एजंट ९ ३०००
नियम मोडणारे प्रवासीसंख्या दंड
धोकादायक प्रवास करणारे १३१ १५,५००
महिलांच्या डब्यातून प्रवास करणारे १४ १९००
धूम्रपान करणारे १७ ३०००
रेल्वे केबल चोरी १० १०,०००
रेल्वे फाटकाचे नुकसान ६ ६०००
गाडीत भांडण करणारे २ १६००