कार अपघातात सहा लग्न व-हाडी ठार
By admin | Published: April 23, 2016 02:28 AM2016-04-23T02:28:42+5:302016-04-23T02:28:42+5:30
सर्व मृतक लोणार तालुक्यातील; लग्न सोहळा आटोपून घरी जात असताना घडला अपघात.
भर जहाँगिर (वाशिम) : लग्न सोहळा आटोपून घरी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा भीषण अपघात होऊन, कारमधील सहा जण घटनास्थळीच ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना रिसोड तालुक्यातील भर जहाँगीर गावाजवळ २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. सर्व मृतक बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वडव येथील रहिवासी आहेत.
लोणार तालुक्यातील वडग गावातील नागरिक रिसोड तालुक्यात आगरवाडी येथे एका विवाह सोहळय़ासाठी आले होते. विवाह सोहळा आटोपून ते एमएच १४ सीएक्स ८६५५ क्रमांकाच्या इंडिका कारने शुक्रवारी सायंकाळी गावासाठी निघाले. भर जहाँगीर गावापासून १ किमी अंतरावरील एका वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला असलेल्या कडूलिंबाच्या झाडावर आदळली. त्यानंतर शेतकर्याने हळदीचे बेणे ठेवण्याकरिता केलेल्या एका खड्डयात ही कार पडली. या अपघातात सुनिल माणिकराव मुंडे, गजानन कडुजी घुगे, बाळू नामदेव काळे, अशोक भगवान कायंदे, पिंटू तनपुरे आणि चालक विष्णू रामकिसन सोनोने यांचा मृत्यू झाला. कार खड्डयात पडल्याने, कारमधील लोकांना बाहेर पडता आले नाही. कारमधील सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पंढरी रणधीर सोनवणे हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रिसोड येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती; मात्र जखमींना बाहेर काढण्यास कुणीही धजावले नाही. अखेर रिसोड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून, जखमींना रूग्णालयात भरती केले.