सहा महिन्यांपूर्वीच फरहान होता ताब्यात
By admin | Published: February 1, 2016 02:50 AM2016-02-01T02:50:41+5:302016-02-01T02:50:41+5:30
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी मुंब्रा येथील फरहान शेख (२५) याला सौदी अरेबियाच्या पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वीच अटक केली होती
जितेंद्र कालेकर ल्ल ठाणे
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी मुंब्रा येथील फरहान शेख (२५) याला सौदी अरेबियाच्या पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वीच अटक केली होती. चौकशीदरम्यान तो ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेकरिता काम करीत असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला भारताच्या हवाली केल्याचे सूत्रांनी सांगितले.
फरहान हा तीन वर्षांपूर्वी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी टुरिस्ट व्हीसा काढून सौदीमध्ये गेला होता. तिथे एका खासगी कंपनीत नोकरीची त्याला संधी मिळाली. चांगले काम आणि पगार मिळाल्याने तो परत आला नाही. जुलै २०१५ मध्ये मुंब्रा-कौसा भागात राहणारी त्याची मावस आजी मैरुन्निसा शेख त्याला भेटण्यासाठी तेथे गेली होती. ती काही खरेदीसाठी मार्केटला गेली असता त्यावेळी सौदी पोलिसांनी फरहानला बेकायदेशीररीत्या राहील्याप्रकरणी चौकशीसाठी पहिल्यांदा ताब्यात घेतले होते. ही चौकशी आॅक्टोबर २०१५ पर्यंत चालूच होती. या चौकशीदरम्यान इसिसच्या कारवायांना समर्थन करणे, त्यामध्ये भरतीसाठी इतरांना प्रवृत्त करणे तसेच भारत आणि इतर मित्र राष्ट्रांमध्ये अतिरेकी कारवाया करण्याचा प्रयत्न फरहान याने केल्याचे सौदी पोलिसांच्या निदर्शनास आल्याने फरहानला रीतसर अटक करण्यात आली.
दरम्यान, फरहान आजीशी फोनद्वारे संपर्कात होता. सौदी पोलीस केवळ एक मिनिटांकरिता आजीशी बोलण्याची परवानगी देत होते. फोनवर ‘मी निर्दोष आहे, भारतात लवकरच सुखरूप परत येईन. केवळ चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, इतकेच तो सांगायचा’, अशी माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या नातेवाइकांसह आजीचीही चौकशी सुरू केली आहे. सौदीमध्ये नोकरी लागल्यावर सुरुवातीला काही दिवस त्याने पैसे पाठविले. नंतर, त्याचे पैसे येणे बंद झाल्याचे त्याच्या नातेवाइकांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले.
फरहान शेख निष्पाप असल्याचा आजीचा दावाकुमार बडदे ल्ल मुंब्रा
इसिसमध्ये कार्यरत असल्याच्या संशयातून एनआयएने अटक केलेला कौसा भागातील फरहान शेख हा निष्पाप असून त्याला यात कोणीतरी ओढल्याची शक्यता त्याची मावस आजी मेहरुन्निसा शेख यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. तो सौदी पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच्याशी ४ जानेवारी २०१६ रोजी अखेरचे बोलणे झाले होते. त्यानंतर, त्याला एनआयएने अटक केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आपला नातू अशा कारवायांमध्ये अडकल्याचे समजल्यानंतर मेहरुन्निसा अत्यंत खिन्न झाल्या आहेत. आपला नातू यात कसा अडकला, हाच प्रश्न त्यांना सतत भेडसावत होता. त्या काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. प्रचंड भेदरलेल्या होत्या. त्यांना रक्तदाबाचाही त्रास असल्याने त्या या विषयावर फारसे बोलत नव्हत्या. फरहान दिड वर्षाचा असताना त्याच्या आईने पेटवून घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर, वडीलही त्याला सोडून गेले. त्याचा मोठा भाऊ रेहान हा मानसिक रुग्ण आहे, तर बहीण विवाहित असून ती दुबईत असते. या तिन्ही भावंडांचा त्यांच्या मावस आजीनेच सांभाळ केला. त्याचे शालेय शिक्षण मुंब्रा येथे झाले. १४ वीपर्यंतचे शिक्षण सोमय्या महाविद्यालयात झाले. सौदीमध्ये गेल्यानंतर संगणक दुरुस्तीची नोकरी त्याला मिळाली. शांत पण एकाकी राहणारा फरहान फारसा कोणामध्ये मिसळत नव्हता, अशी माहिती तो वास्तव्यास असलेल्या कौसा येथील ‘दोस्त कॉम्पलेक्स’च्या काही रहिवाशांनी दिली. मुदब्बीरपाठोपाठ फरहानही इसिसमध्ये अडकल्याचे वृत्त येताच रविवारी दिवसभर अनेक वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी या परिसरात गर्दी केली होती.