वर्णमालेतील बदलांना सहा महिन्यांची मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 05:28 AM2023-06-18T05:28:09+5:302023-06-18T05:32:06+5:30
१० नोव्हेंबर रोजी याविषयी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने देवनागरी लिपी व वर्णमालेनुसार मराठी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणकावर मराठीचा वापर करताना काही नवीन बदल सुचविले होते. यामध्ये देठयुक्त ल ऐवजी, पाकळीयुक्त ल तसेच गाठयुक्त श ऐवजी देठयुक्त श, तसेच वर्णमालेत ॲ व ऑ या स्वरांचाही समावेश करण्यात आला होता. १० नोव्हेंबर रोजी याविषयी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
देठयुक्त श आणि पाकळीयुक्त ल वापरण्यावरून वादही निर्माण झाला होता. केवळ हिंदीतून आले म्हणून बदल करू नये असेही सांगण्यात आले होते. मराठी भाषा विभागाकडून सोमवारी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे या बदलांच्या अंमलबजावणीसाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.