महापालिकेच्या नव्या सभागृहात सहा मुस्लीम चेहऱ्यांची वाढ
By Admin | Published: February 27, 2017 01:47 AM2017-02-27T01:47:38+5:302017-02-27T01:47:38+5:30
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २९ मुस्लीम उमेदवार विजयी झाले असून, त्यामध्ये महिला नगरसेवकांची संख्या १८ आहे.
जमीर काझी,
मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २९ मुस्लीम उमेदवार विजयी झाले असून, त्यामध्ये महिला नगरसेवकांची संख्या १८ आहे. या वेळी मुस्लीम नगरसेवकांच्या संख्येत गतवेळेपेक्षा सहाने वाढ झाली आहे़ भाजपा वगळता अन्य सर्व प्र्रमुख पक्षांतून हे उमेदवार निवडून आले आहेत. सत्ताधारी शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा दोन मुस्लीम सदस्यांना सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे.
नव्या सभागृहामध्ये मोठ्या पराभवाला सामोरे गेलेल्या काँग्रेसकडून सर्वाधिक ११ नगरसेवक आहेत. तर ९ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आणि समाजवादी पार्टीचे सर्व सहा नगरसेवक मुस्लीम आहेत. सेना, एमआयएम व अपक्ष म्हणून प्रत्येकी दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यांच्याकडून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले जाण्याची आशा वर्तविली जात आहे. २२७ जागांपैकी सुमारे ५० प्रभागांत मुस्लीम मतांची संख्या निर्णायक आहे. त्याचा विचार करून भाजपा, सेनासहित सर्व प्रमुख पक्षांनी एकूण १९७ मुस्लीम उमेदवारांना संधी दिली होती. त्यामध्ये ९१ महिला उमेदवार होत्या. अपक्ष मुस्लीम उमेदवारांची संख्या जवळपास अडीचशेवर होती. या सर्वामधून प्रत्यक्षात एकूण २९ जणांना सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे.
सपाने सर्वाधिक ५८ मुस्लीम उमेदवार दिले होते. तर एमआयएमने ५४, राष्ट्रवादीने ४१ तर कॉँग्रेसच्या तिकिटावर २९ जण उभे होते. सत्तेसाठी लढणाऱ्या सेना व भाजपाने मुस्लीमबहुल वस्तीतून प्रत्येकी ५ जणांना आणि मनसेने ४ जणांना उमेदवारी दिली होती. भाजपा व मनसे वगळता अन्य पक्षातून मुस्लीम चेहरे सभागृहात आले आहेत. चंगेज मुलतानी व मुमताज खान हे दोन अपक्ष विजयी झाले.
>धनुष्यबाणावर पहिल्यांदाच विजयी
महापालिकेवर गेल्या २२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेतर्फे आतापर्यंत एकही मुस्लीम सदस्य निवडून आला नव्हता. या वेळी मात्र वॉर्ड क्रमांक ६४मधून शहिदा खान व ९६मधून मोहम्मद हलीम खान धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले. सत्तेसाठीची ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी ६२ व १०२ वॉर्डमधून विजयी झालेल्या अनुक्रमे चंगेज मुलतानी व मुमताज खान या अपक्षांना आपल्याकडे ओढण्यात सेना यशस्वी झाली आहे.
मुंबईत जवळपास ५० वॉर्डांमध्ये मुस्लीम समाजाची लोकसंख्या अधिक आहे. भायखळा, नागपाडा, माहीम, कुर्ला, गोवंडी, मालाड, वांद्रे, बेहरामपाडा, चांदिवली, मानखुर्द, शिवाजीनगर आदी भागांचा प्रामुख्याने समावेश आहे. निवडणुकीत मुस्लीम उमेदवारांची संख्या अधिक असली तरी बहुतांश जण एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. एकाच निवडणुकीत विजयी झालेल्या मुस्लीम उमेदवारांचा आकडा २३च्या वरती कधी गेलेला नव्हता. यंदा मात्र त्यामध्ये आणखी सहाने वाढ झाली.