मध्य रेल्वे : अंबरनाथ-बदलापूरदरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटून सहा प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 07:20 PM2017-08-19T19:20:35+5:302017-08-19T19:21:57+5:30
अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांना कल्याणमधील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कल्याण, दि. 19 - अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांना कल्याणमधील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रवाशांची नावे सचिन घाग व विनय बडेकर अशी आहे. विनय हा विद्यार्थी असून सचिन हा डोंबिवलीतील एका खासगी कंपनीतील कर्मचारी आहे. विनयच्या हाताला तर सचिनच्या तोंडाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जखमी प्रवाशांना बदलापूर रेल्वे स्थानकातच रोखून धरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सचिनचा मित्र देवीदास भगत यांनी सांगितले की, बदलापूर रेल्वे स्थानकात रुग्णवाहिका उभी असतानादेखील सचिन व विनय यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. घटनास्थळी रुग्णवाहिका 40 मिनिटे थांबवून ठेवण्यात आली होती. दोनच जखमी प्रवासी कसे नेणार अन्य प्रवाशांना जोपर्यंत आणले जात नाही. तोपर्यंत रुग्णवाहिका रुग्णालयात नेली जाणार नाही, रेल्वे प्रशासनाची अशी चीड आणणरी वृत्ती समोर आल्याने अन्य प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळेच उपचारांसाठी तब्बल 40 मिनिटे उशीर झाला असल्याचा आरोपही भगत यांनी केला आहे.
मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला होता परिणाम
अंबरनाथ स्टेशनवर लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची कर्जत- कल्याण दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. लोकल ट्रेन खोळंबल्याने बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली होती. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. शनिवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल ट्रेन अंबरनाथ स्टेशनवर येत असताना लोकलचा पेंटाग्राफ तुटला. पेंटाग्राफ तुटल्याने अंबरनाथ स्टेशनवरुन मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती.