नदीच्या पुरात वाहून गेलेल्या सहा जणांचा मृत्यू
By Admin | Published: August 6, 2015 01:09 AM2015-08-06T01:09:09+5:302015-08-06T01:09:09+5:30
राज्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले असून, बुधवारी विदर्भ व खान्देशात मुसळधार पाऊस झाला. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने
नागपूर/जळगाव/औरंगाबाद : राज्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले असून, बुधवारी विदर्भ व खान्देशात मुसळधार पाऊस झाला. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने विदर्भात चार व जळगावमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. पश्चिम विदर्भातील ४७ तालुक्यांत अतिवृष्टी झाली तर पश्चिम वऱ्हाडातील जिल्हेसुद्धा जलमय झाले आहेत. मराठवाड्यात बुधवारीही रिपरिप सुरू होती.
अकोल्यात सर्वाधिक १७९.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. अमरावतीमधील १२, तर तर जळगाव जिल्ह्यात तापीला नदीला आलेल्या पुरात रावेर तालुक्यातील १० गावांचा संपर्क तुटला आहे. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात काही गावांमध्ये पुराचे पाणी घुसले. अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील ७ तालुके वगळता ४७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. नदीनाल्यांना पूर आल्याने अनेक मार्ग बंद झाले. अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातही सर्वसाधारण पाऊस झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सकाळी व दुपारी विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीची माहिती घेतली. त्यांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)