सहा विद्यार्थीनींच्या शाळेला शिक्षण सचिवांची आकस्मिक भेट!
By admin | Published: September 24, 2015 11:50 PM2015-09-24T23:50:02+5:302015-09-24T23:50:02+5:30
दुर्गम गावात नंदकुमारांची गाडी; शिक्षणाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न.
बुलडाणा : अतिशय दुर्गम गाव.. गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या अवघी ६ विद्यार्थीनींची.. दोन शिक्षक, त्यापैकी एक पूर्ण वेळ.. शिक्षण विभागाचे अधिकारीही सहसा ज्या शाळेकडे फिरकत नाहीत, अशा या दुर्लक्षित शाळेत साक्षात शिक्षण सचिव दाखल होणे, हा प्रसंग तसा दुर्मिळच. मातृतीर्थ सिंदखेडराजात गुरुवारी हे चित्र पहावयास मिळाले. राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार हे गुरूवारी औरंगाबाद येथून विदर्भात दाखल होताच, सिंदखेडराजा तालुक्यातील निमखेड गावातील शाळेला भेट देवून ग्रामीण भागातील शिक्षणाची स्थिती त्यांनी समजून घेतली. सिंदखेडराजा व शिवणी टाका यादरम्यान निमखेड हे दुर्गम असे गाव आहे. या गावात जिल्हा परिषदेची एक शाळा असून, शाळेच्या पटावर केवळ सहा मुली आहेत. या गावापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. शिक्षण सचिव नंदकुमार यांची पिवळ्या दिव्याची गाडी खाचखळगे चुकवत, सकाळी १0 वाजता गावात पोहचली. गावात येणारी ही पहिलीच दिव्याची गाडी. त्यामुळे ग्रामस्थ या गाडीमागे धावत शाळेजवळ पोहचले. शाळेला कुलूप होते. त्याचवेळी निमशिक्षक जाधव धावत-पळत शाळेवर पोहचले. नंदकुमार यांच्यासोबत जिल्हा शिक्षण विभागातील अधिकारी आणि तालुक्यातीलच दत्तापूर येथील शिक्षक विनोद ठाकरे, तसेच भोसा येथील शिक्षक शरद नागरे हे उपस्थित होते. नंदकुमार यांनी ग्रामस्थांना स्वत:चा परिचय देऊन, शाळेची चौकशी केली. अवघ्या सहा मुलींसाठी भरणारी ही शाळा बंद झाली तर काय होईल, याबाबत त्यांनी ग्रामस्थांचे मत जाणण्याचा प्रयत्न केला. शिक्षक दररोज येतात का, मुली नियमित शाळेत जातात का, या मुलींना दुसर्या शाळेत पाठविले तर चालेल का, अशा अनेक प्रश्नातून त्यांनी ग्रामस्थांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न केला. राज्य शासन १0 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाप्रत आली आहे. या पृष्ठभूमिवर दुर्गम भागातील कमी पटसंख्येच्या शाळांची प्रत्यक्ष पाहणी करुन ग्रामीण भागाची गरज जाणून घेण्याचा प्रयत्न शिक्षण सचिव करीत आहेत. त्यानंतर नंदकुमार यांनी मेहकर तालुक्यातील चिंचोली बोरे या शाळेला भेट दिली. त्यांनी येथील विद्यार्थ्यांना परिसर ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले. शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्याही अडचणी समजून घेतल्या.