रॅगिंगप्रकरणी सहा विद्यार्थिनींना अटक, संचालकाविरुद्धही गुन्हे नोंदविण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 02:49 AM2017-09-03T02:49:56+5:302017-09-03T02:50:10+5:30
शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतील (व्हीएमव्ही) मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंगप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी पाच मुलींना वसतिगृहातून अटक केली.
- गणेश देशमुख ।
अमरावती : शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतील (व्हीएमव्ही) मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंगप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी पाच मुलींना वसतिगृहातून अटक केली. अन्य एक मुलगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने सुटी होताच तिला अटक केली जाईल. महाराष्ट्र रॅगिंग कायदा १९९९ च्या कलम ४, ३४१, ३४२, ३५४ अन्वये गुन्हे दाखल करून ही कारवाई करण्यात आली.
अत्यंत गंभीर प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून संस्थेच्या संचालक अर्चना नेरकर यांच्याविरुद्ध तातडीने ‘निग्लिजन्स अॅक्ट’अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आदेश अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना शनिवारी दिले.
प्रवीण पोटे पाटील यांनी हे दुपारी शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत गेले आणि तक्रारकर्त्या मुलींकडून सर्व प्रकारची माहिती घेतली. पीडित मुलींनी अनेक गंभीर आणि धक्कादायक मुद्दे पालकमंत्र्यांना सांगितले. त्यांनी रॅगिंग करणाºया मुलींशीही संवाद साधला. त्यानंतर त्यांनी संचालकांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले.
पालकमंत्री तेथून गेल्यानंतर अर्चना नेरकर संस्थेत पोहोचल्या. ‘लोकमत’च्या संबंधित बातमीदाराची पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांशी चर्चा होत असल्याचे फूटेज पाहून ‘तुम्ही सांगितले म्हणूनच हे सारे घडले,’ असा हास्यास्पद आरोप त्यांनी ‘लोकमत’वर केला.
काय आहे प्रकरण?
वसतिगृहातील एम.ए. द्वितीय वर्षाच्या मुलींनी २७ आॅगस्ट रोजी बी.एस्सी. द्वितीय वर्षाच्या मुलींना विवस्त्र करून त्यांचा मासिकधर्म अर्थात ऋतुस्राव तपासल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत ४३ मुलींनी तक्रार करूनही ह्यअॅन्टि रॅगिंग कमिटीह्णने पाच दिवस पोलीस तक्रार नोंदविली नव्हती. उलटपक्षी तक्रारकर्त्या मुलींवर प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणला जात होता. रॅगिंगचा हा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी त्वरेने दखल घेतली. अॅन्टि रॅगिंग कमिटीचे प्रमुख विवेक मधुकर राऊत (४२) यांनी शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांत तक्रार नोंदविली. शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास गाडगेनगर पोलिसांनी गुन्हे नोंदविले. शनिवारी पहाटे मुलींना अटक केली.