एसटीच्या सहा हजार गाड्या होणार सेवेतून बाद, १५ लाख प्रवाशांना मोठा फटका बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 09:05 AM2021-06-12T09:05:24+5:302021-06-12T09:05:52+5:30
ST Bus : महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार गाड्या आहेत. यातून रोज जवळपास ६० लाख प्रवाशांची वाहतूक होते. आयुर्मान संपल्याने ३ हजार गाड्याथेट रिटायर कराव्या लागणार आहेत, तर २ हजार गाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत.
- प्रसाद कानडे
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेतून जवळपास ६ हजार गाड्या बाद होणार आहेत. एसटी प्रशासन भाडेतत्त्वावर ५०० गाड्या घेणार असले तरी ही संख्याही तोकडी पडणार आहे. याचा थेट फटका दैनंदिन प्रवास करणाऱ्या जवळपास १० ते १५ लाख प्रवाशांना बसणार आहे.
महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार गाड्या आहेत. यातून रोज जवळपास ६० लाख प्रवाशांची वाहतूक होते. आयुर्मान संपल्याने ३ हजार गाड्याथेट रिटायर कराव्या लागणार आहेत, तर २ हजार गाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. एक हजार गाड्या तांत्रिक कारणासाठी डेपो व कार्यशाळेत असतात. या गाड्या सेवेत नसतील तर रोज १० ते १५ लाख प्रवाशांची गैरसोय होईल.
एसटीचा संचित तोटा ९ हजार कोटींच्या घरात गेल्याने नव्या गाड्यांसाठी पैसा नाही. एसटी स्वतःचे पेट्रोल पंप सुरू करणार आहे. भाडेतत्त्वावरील गाड्यांना या पंपांवरून डिझेल खरेदी अनिवार्य असेल. सध्या बसला किलोमीटरमागे ४४ रुपये खर्च येतो. भाडेतत्त्वावरील गाड्यांना २५ ते ३० रुपये खर्च आल्याने किलोमीटरमागे १४ रुपये बचत होईल. त्यामुळे जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रमुख मार्गांवरच ह्या गाड्या
धावतील.
आयुर्मान संपलेल्या गाड्या प्रवासी सेवेतून बाद होणार आहेत. पण, आम्ही टप्प्याटप्पाने याची अंमलबजावणी करू. प्रवाशांची गैरसोय होऊ देणार नाही.
- डॉ. शेखर चन्ने, व्यवस्थापकीय
संचालक तथा उपाध्यक्ष