गौरीपूजनाला गेलेल्या सहा जणींचा बुडून मृत्यू

By admin | Published: September 4, 2016 01:44 PM2016-09-04T13:44:29+5:302016-09-04T17:57:57+5:30

हरितालिकेच्या पावन पर्वावर गावालगतच्या नाल्यावर गौरी पूजेसाठी गेलेल्या सहा जणींचा बंधा-याच्या शेजारी असलेल्या खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाला.

Six women drowned in Gauripujan | गौरीपूजनाला गेलेल्या सहा जणींचा बुडून मृत्यू

गौरीपूजनाला गेलेल्या सहा जणींचा बुडून मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. ४ -  हरितालिकेच्या पावन पर्वावर गावालगतच्या नाल्यावर गौरी पूजेसाठी गेलेल्या सहा जणींचा बंधा-याच्या शेजारी असलेल्या खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये चार तरुणी, एक बालिका आणि एका महिलेचा समावेश आहे. ही दुर्दैवी घटना हिंगणा तालुक्यातील देवळी (सावंगी) शिवारात रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. सहाही जणींचे मृतदेह सकाळी ११.३० वाजेपर्यंत पाण्याबाहेर काढण्यात आले होते. 
मृतांमध्ये मंदा नत्थूजी नागोसे (५५), जानव्ही ईश्वर चौधरी (१३), प्रिया रामप्रसाद राऊत (१८), पूजा रतन डडमल (१७), पूनम तुळशीराम डडमल (१८) आणि प्रणिता शंकर चामलाटे (१७) यांचा समावेश आहे. या सर्व हिंगणा तालुक्यातील सावंगी (देवळी) येथील रहिवासी आहेत. रविवारी हरितालिका असल्याने गावातील तरुणी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गावालगतच्या नाल्यावर गौरी घेऊन पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. यावर्षी या नाल्याचे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत खोलीकरण करण्यात आले. या नाल्यावर बंधारा बांधण्यात आला असून, बंधा-याच्या शेजारी मोठा व खोल खड्डा खोदण्यात आला आहे. 
पूजा आटोपल्यानंतर या प्रिया, पूजा, पूनम, प्रणिता व जानव्ही या खड्ड्यामध्ये आंघोळ करण्यासाठी उतरल्या. त्या पुढे खोल पाण्यात जाताच बुडायला लागल्या. त्यामुळे काठावर असलेल्या तरुणी घाबरल्या आणि त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्याचवेळी मंदा नागोसे या शेतात जात होत्या. त्यांना या तरुणी बुडत असल्याचे दिसताच त्या या तरुणींना वाचविण्यासाठी पुढे सरसावल्या. दुर्दैवाने या सहाही जणी खोल पाण्यात बुडाल्या. 
काही वेळातच शेजारी असलेल्या शेतातील शेतकरी व मजुरांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत सहाही जणी बुडाल्या होत्या. माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढले. जानव्ही ही इयत्ता सातवी, प्रिया, प्रणिता व पूनम या अकरावीमध्ये सावंगी (देवळी) येथील दादासाहेब खडसे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिकायच्या. पूजाने दहावीपासून शाळा सोडली होती. विशेष म्हणजे, या सहाही जणी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. या घटनेमुळे सावंगी (देवळी) गावावर शोककळा पसरली आहे. 
 

Web Title: Six women drowned in Gauripujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.