जेलरसह सहा महिला पोलिसांना अटक
By Admin | Published: July 2, 2017 04:56 AM2017-07-02T04:56:00+5:302017-07-02T04:56:08+5:30
भायखळा महिला कारागृहातील मंजुळा शेट्येच्या हत्येप्रकरणी शनिवारी जेलरसह सहा महिला पोलिसांना अटक करण्यात आली. मात्र, मंजुळाची
मनीषा म्हात्रे/लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भायखळा महिला कारागृहातील मंजुळा शेट्येच्या हत्येप्रकरणी शनिवारी जेलरसह सहा महिला पोलिसांना अटक करण्यात आली. मात्र, मंजुळाची हत्या केली नसल्याचा दावा या संशयितांनी केला आहे. तसेच यामागे इंद्राणी मुखर्जीचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली मंजुळा शेट्ये (वॉर्डन) हिचा भायखळा कारागृहात मारहाणीमुळे मृत्यू झाला होता. तिला विवस्त्र करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती, असे तक्रारदार कैदी मरियम शेख हिने आपल्या जबाबात म्हटले आहे. तर, महिला पोलिसांनी मंजुळाला मारझोड केल्याचे मी पाहिले आहे. तिच्या गळ्यात फासाप्रमाणे साडी अडकविण्यात आली आणि तिला फरफटत नेण्यात आले, असे शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने नुकतेच विशेष न्यायालयाला सांगितलेले आहे.
याप्रकरणी जेलर मनीषा पोखरकर हिच्यासह पोलीस शिपाई बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर ते लगेचच फरार झाले होते. संबंधित प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून तपास अधिकारी म्हणून समाजसेवा शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रभा राऊळ यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मंजुळाच्या मृत्यूनंतर कारागृहात तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी २०० कैद्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश कदमला व्हायचेय साक्षीदार
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी आमदार रमेश कदम याने मंजुळा शेट्येच्या हत्याप्रकरणात साक्ष देण्यासाठी सत्र न्यायालयात विनंती अर्ज केला आहे.
पहिली अटक बिंदू नाईकडेची
शनिवारी पनवेलच्या कामोठे येथील घरातून पोलीस शिपाई बिंदू नाईकडे हिला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला असून तिने हत्येच्या आरोपाचा इन्कार केला आहे.
जबाब नोंदविणे सुरू
अन्य पाच संशयित आरोपी शनिवारी सायंकाळी अटकपूर्व जामिनासाठी वकिलाला भेटायला येणार असल्याचे बिंदू नाईकडे हिच्या चौकशीतून समजले. त्यावरून गुन्हे शाखेने मोबाइल लोकेशनवरून जेलर मनीषासहीत इतर पाच संशयितांना फोर्ट
येथून अटक केली. या पाच जणींची स्वतंत्रपणे चौकशी करत त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. रविवारी त्यांना हॉलीडे कोर्टात हजर करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.
तक्रारदाराचा जबाब खोटा
मंजुळाच्या हत्येशी आपला संबंध नसून यामागे इंद्राणी मुखर्जीचेच षडयंत्र असल्याचा दावा बिंदूने केला आहे. इंद्राणीला वेगळया बरॅकमध्ये ठेवून तिच्या हालचालींवर पोलिसांचे विशेष लक्ष होते. याच रागातून इंद्राणीच्या सांगण्यावरुन या प्रकरणातील तक्रारदार मरियम शेखने खोटा जबाब दिल्याचे तिचे म्हणणे आहे. इंद्राणीचा सर्वांवर दबदबा आहे. ती पैशांच्या जोरावर सर्वांना बांधून ठेवते, असेही तिने सांगितले. मंजुळा आजारी होती. रात्री ती शौचालयात बेशुद्ध पडल्याची माहिती आपल्याला अन्य कर्मचाऱ्यांकडून समजली, असा दावा बिंदूने केला आहे.