सोळा हजार लातूरकर करणार देहदान!
By admin | Published: June 12, 2016 03:56 AM2016-06-12T03:56:55+5:302016-06-12T03:56:55+5:30
लातूर जिल्ह्यातील श्री सांप्रदाय सेवा समितीच्या १६ हजार सदस्यांनी मरणोत्तर देहादानाचा संकल्प केला असून आतापर्यंत तीन हजार लोकांनी अर्ज भरुन दिले आहेत. गुरुपोर्णिमेदिनी संपूर्ण १६ हजार
- राजकुमार जोंधळे, लातूर
लातूर जिल्ह्यातील श्री सांप्रदाय सेवा समितीच्या १६ हजार सदस्यांनी मरणोत्तर देहादानाचा संकल्प केला असून आतापर्यंत तीन हजार लोकांनी अर्ज भरुन दिले आहेत. गुरुपोर्णिमेदिनी संपूर्ण १६ हजार भरलेले अर्ज वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केले जाणार आहेत.
जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज यांचा हा ‘श्री सांप्रदाय’ जिल्ह्यातील बहुतांश गावात पोहोचला आहे. या सांप्रदायाचे जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक भक्त आहेत. या
सांप्रदायाने धर्माला विज्ञानाची जोड देऊन एक नवा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी या सांप्रदायाने गावा-गावात शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान, आरोग्य शिबीर, विधवा, परितक्ता महिलांना शिलाई मशिनचे वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत केली होती.
यावेळी सांप्रदायाने आपल्या १६ हजार सदस्यांनी देहदानाविषयी माहिती देऊन नोंदणीचे आवाहन केले. आतापर्यंत तीन हजार लोकांनी आपले अर्ज भरुन दिले आहेत.
१६ हजार दाते सहज होतील : विठ्ठल पाटील
या उपक्रमाविषयी बोलताना सांप्रदायाचे विठ्ठल पाटील म्हणाले की, लातूर जिल्ह्यात श्री सांप्रदाय सेवा समितीचे लाखावर भाविक, भक्त आणि सदस्य आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत तब्बल १६ हजार भाविकांनी आपले देहदान करण्याचा निर्धार केला आहे.
...हेच अध्यात्माचे मूळ - शुभांगी स्वामी
सांप्रदायाच्या महिला समितीच्या प्रमुख शुभांगी स्वामी म्हणाल्या की, धर्म सांगतो की आपला देह सद्गुणांच्या कामी आला पाहीजे. देहदान ही संकल्पना नवी आहे. अनेकांना याबाबत माहिती नाही. आम्ही एकट्या लातूर जिल्ह्यातून १६ हजार जणांचा देहदानाचा संकल्प केला. याला चांगला प्रतिसाद आहे.