स्केटिंग रिंकची दुरवस्था

By admin | Published: May 19, 2016 02:18 AM2016-05-19T02:18:21+5:302016-05-19T02:18:21+5:30

मोहननगर, चिंचवड येथे शहरातील सर्वांत मोठे स्केटिंग आहे.

Skating rink disturbance | स्केटिंग रिंकची दुरवस्था

स्केटिंग रिंकची दुरवस्था

Next


पिंपरी : मोहननगर, चिंचवड येथे शहरातील सर्वांत मोठे स्केटिंग आहे. मात्र, रिंकच्या काँक्रीटला अनेक ठिकाणी भेगा पडल्याने त्यास अडकून अनेक खेळाडू जखमी होत आहेत. तसेच, येथील असुविधा अभावी खेळाडूंची गैरसोय होत आहे.
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी राजर्षी शाहूमहाराज जलतरण तलावाशेजारी किसन काळभोर स्केटिंग रिंक उभारला आहे. रिंकची लांबी १७० मीटर आहे. ही शहरातील सर्वांत मोठी रिंग आहे. मात्र, देखभाल आणि दुरुस्तीअभावी येथे खेळाडू आणि प्रशिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथे सकाळ व संध्याकाळच्या सत्रात स्केटिंग खेळाचा सराव चालतो.
काँक्रीटच्या रिंकला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्या वेळीच दुरुस्त न केल्याने भेगा वाढतच आहेत. तसेच, अनेक ठिकाणी पृष्ठभाग खाली आणि वर, तसेच कडक झाला आहे. या भेगामध्ये अडकून खेळाडू पडत आहेत. त्याचबरोबर रिंकची रुंदी सर्वत्र एकसारखी नाही. कोठे २ मीटर, तर कोठे १० मीटर अंतर आहे. त्यामुळे नवा खेळाडू गोंधळून जातो.
या खड्ड्यामुळे ११ वर्षांचा नवोदित खेळाडू पडला. डोक्यात हेल्मेट असतानाही त्याच्या डोक्यात मोठी इजा झाली. त्याला त्वरित खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार केले गेले. हा प्रकार गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात घडला होता. गेल्या आठवड्यात खड्ड्यात पडल्याने एका खेळाडूच्या पायास जखम झाली. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
या गैरसोयीमुळे खेळाडू या ठिकाणी सराव करण्यास उत्सुक नाहीत. सराव करताना जखमी होण्यापेक्षा दुसरीकडे सराव करण्यास खेळाडू प्राधान्य देत आहेत. त्यामुळे खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.
स्केटिंग रिंकमधील समस्यांबाबत क्रीडा विभागास वारंवार तक्रार केली आहे. मात्र, उपाययोजना करण्याबाबत कोणीच पुढाकार घेत नाही. या समस्यांमुळे खेळाडू आणि पालक वैतागले आहेत. क्रीडा विभागाने त्वरित दखल घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी खेळाडूंच्या पालकांनी केली आहे.(प्रतिनिधी)
>झुडपे वाढली : झाडांमुळे ट्रॅक होणार खराब
मैदानात मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडी-झुडपी वाढली आहेत. मैदानाच्या मोकळ्या भागात वड आणि पिंपळाची झाडे लावली आहेत. ही झाडे वाढल्याने समोरील आणि पलीकडील बाजूचे दिसत नाही. या वृक्षामुळे येत्या ३ ते ४ वर्षांत संपूर्ण ट्रॅक खराब होण्याची शक्यता आहे. त्यांची मुळे ट्रॅकमध्ये पसरत आहेत. वाढलेल्या झाडीमुळे खेळाडू एकमेकांना धडकून पडतात. मैदान स्केटिंग खेळासाठी राखीव आहे. असे असतानाही या मैदानात परिसरातील नागरिक, मुले आणि ज्येष्ठ नागरिक वॉकिंग आणि जॉगिंग करीत असतात. मैदानातील कोणत्याही भागात कशाही पद्धतीने नागरिक वावरत असल्याने खेळाडूंना सराव करताना अडथळा निर्माण होत आहे.
मैदानात कचरा, दारूच्या बाटल्या, सिगारेट आणि गुटख्याच्या पाकिटाचे ढीग साचले आहेत. नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरात कचरा साचला आहे. त्याचबरोबर मोकाट कुत्री मैदानात मुक्तपणे वावरत असतात. कुत्रा चावा घेईल म्हणून लहान खेळाडू सराव करताना घाबरतात. तसेच, येथील दिवे बंद असल्याने अंधारात सराव करताना गैरसोय होते. येथील स्वच्छतागृहास टाळे असल्याने त्याचा वापर खेळाडूंना करता येत नाही. त्यामुळे खेळाडूंची कुचंबणा होते.

Web Title: Skating rink disturbance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.