रोजगारयुक्त महाराष्ट्रासाठी ‘कौशल्य विकास’ कटिबद्ध
By admin | Published: July 16, 2017 03:06 AM2017-07-16T03:06:14+5:302017-07-16T03:06:14+5:30
राज्यातील तरुणांना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राज्यात राबविण्यात येत असून, आगामी काळात रोजगारयुक्त महाराष्ट्र घडावा, यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील तरुणांना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राज्यात राबविण्यात येत असून, आगामी काळात रोजगारयुक्त महाराष्ट्र घडावा, यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ‘जागतिक युवा कौशल्य दिना’निमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते. कार्यक्रमास कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार आशिष देशमुख विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता आयुक्त ई. रवींद्रन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक अनिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री निलंगेकर-पाटील म्हणाले की, भारत हा एकमेव देश असेल, जो प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युवकांना कुशल प्रशिक्षण देण्यावर आम्ही भर देत आहोत. कामगार व कौशल्य विकास यांचा मेळ घालून अधिकाधिक खासगी उद्योजकांनी राज्य शासनाबरोबर काम करावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
‘मेक इन इंडिया’नंतर कौशल्य विकास विभागाचे ६२ सामंजस्य करार झाले असून, त्यापैकी ५८ करार कार्यन्वित झाले आहेत. ‘महामैत्री’ या पोर्टलद्वारे विविध क्षेत्रांतील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. युवकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना विद्यावेतन आयटीआयचे आधुनिकीकरण, विविध उद्योगांमध्ये आवश्यक असणारे अभ्यासक्रमाबाबत कौशल्य विकास विभाग काम करीत असून, हे काम उत्तम असल्याची पावती पॅरिस येथे मिळालेल्या पुरस्काराने सिद्ध झाले आहे. पॅरिस येथे नुकत्याच झालेल्या ग्लोबल स्कील समीटमध्ये राज्याला उत्कृष्ट आयटीआयसाठी पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून १०० हून अधिक शासकीय आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. आज महाराष्ट्रात आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, यावरून आयटीआयची गरज अबाधित असल्याचेही निलंगेकर-पाटील यांनी सांगितले. आगामी काळात भारतसुद्धा चीन, युरोपप्रमाणे कौशल्य विकासात अग्रेसर राहिल. पाठ्यपुस्तकाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण विद्यार्थ्यांना हवे, म्हणून अप्रेंटिसशिप कायद्यात बदल करण्यात आला असून, याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले. या वेळी राज्यातील निवडक १२ औद्योगिक आस्थापनांना, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते याच निधीचे वाटप करण्यात आले.