स्किमर टोळी जेरबंद
By admin | Published: October 6, 2015 03:00 AM2015-10-06T03:00:14+5:302015-10-06T03:00:14+5:30
भारतासह इंग्लंड, इटली, चिली, रोमानिया तसेच इतर युरोपीय खातेदारांच्या एटीएम कार्डचा डाटा स्किमर मशिनच्या साहाय्याने चोरून त्यांच्या खात्यातून लाखो रुपये गायब
मुंबई : भारतासह इंग्लंड, इटली, चिली, रोमानिया तसेच इतर युरोपीय खातेदारांच्या एटीएम कार्डचा डाटा स्किमर मशिनच्या साहाय्याने चोरून त्यांच्या खात्यातून लाखो रुपये गायब करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यास विनोबा भावे नगर पोलिसांना यश आले. अलीन बुडोई (३१), मारियन ग्रामा (४२), म्यू आयोनेल (४२) अशी आरोपींची नावे असून, तिघेही रोमचे रहिवासी आहेत. अशा प्रकारे एटीएम चोरीप्रकरणी परदेशी नागरिकांना पोलिसांनी अटक करण्याची ही पहिलीच कारवाई आहे.
वांद्रे येथील रहिवासी असलेल्या कॅन्डिस पॉल फर्नांडिस यांचे कॅथलिक सीरियन बँकेमध्ये खाते आहे. १४ सप्टेंबर रोजी त्यांचा मोबाइल खणखणला. मोबाइलमध्ये एटीएममधून एकामागोमाग आलेल्या पैसे काढण्याच्या मेसेजने त्याही चक्रावल्या. एकाच वेळी तब्बल ३६ हजार ५०० रुपये काढण्यात आले. त्यांनी याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तन्वीर शेख, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोहिते आणि त्यांच्या तपास पथकाने शोध सुरू केला. ही रक्कम कुर्ला येथील शीतल सिनेमाजवळील एटीएममधून काढल्याचे समोर आले. एका इसमाने युनियन बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, विजया बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक या बँकांच्या बनावट एटीएम कार्डच्या साहाय्याने पैसे काढल्याचे तपासात उघड झाले. यापूर्वी तक्रारदार महिलेने वांद्रे हिल रोड येथील युनियन बँक आॅफ इंडियाच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढल्याची माहिती दिली. त्यानुसार तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात केली. तेथील एटीएम सेंटरमधून बेकायदेशीरपणे रक्कम काढून घेतल्याच्या तब्बल १७ तक्रारी समोर आल्या. तेथील फुटेजच्या आधारे एक संशयित इसम मोहितेंच्या नजरेत पडला. त्याच्याकडील कपडे खरेदी केलेल्या शॉपिंग सेंटरच्या प्लास्टिक पिशवीच्या आधारे त्याचा मागोवा घेतला. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास करून सुरुवातीला स्थानिक रहिवासी, गुप्त माहितीदारांमार्फत ते आरोपींच्या दलालांपर्यंत पोहोचले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या त्रिकूटाला वांद्रे येथील पालीनाका परिसरातील फातिमा हाऊसमधून अटक केली. त्यांच्या राहत्या घरातून तब्बल २८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या रोकडसह चार अॅपल आयफोन, आयफोन टॅब, दोन लॅपटॉप तसेच स्पाय कॅमेरा, स्किमर, प्लॅस्टिक इलेक्ट्रिक केसिंग असा एकूण ३१ लाख ३४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तिघांनाही फसवणूक, आयटी अॅक्टखाली अटक करण्यात आली आहे. या धाग्यातून आंतरराष्ट्रीय टोळीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यटक व्हिसाद्वारे प्रवेश...
मूळचे रोम येथील रहिवासी असलेले हे त्रिकूट पर्यटक व्हिसाद्वारे आले होते. मुंबईतील वांद्रे येथील फातिमा हाऊसमध्ये ५० हजार रुपये प्रतिमहिना भाडेतत्त्वावर ते दोन महिन्यांपासून राहत होते.
अशी केली चोरी़़़
सुरक्षारक्षक नसलेले एटीएम सेंटर गाठून हे त्रिकूट त्या ठिकाणी स्किमर मशिन बसवून तो डाटा मेमरी कार्डने घेत होते. तसेच एटीएम मशिनच्या स्लॉटमध्ये स्पाय कॅमेरा असलेले फ्लास्टिकचे इलेक्ट्रिक मशिन बसवून ते खातेदारांचा पिन क्रमांक चोरी करायचे. त्यानंतर हा डाटा लॅपटॉपमध्ये उतरून स्किमर मशिनच्या साहाय्याने बनावट एटीएम कार्डच्या प्रिंट काढून नागरिकांची फसवणूक करीत होते. अशा प्रकारे त्यांच्या घरातून तब्बल ४९७ एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत.
शॉपिंग पडली महागात
वांद्रे येथील युनियन बँकेच्या एटीएम सेंटरची तपासणी करीत असताना, एक संशयित इसम तपास अधिकारी गणेश मोहितेंच्या नजरेत पडला.
१३ सप्टेंबरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित इसम एटीएम सेंटरमध्ये आला. त्यानंतर चोरी केलेल्या पैशांनी कपड्यांची खरेदी करून तो २० मिनिटांनी पुन्हा एटीएममध्ये संशयास्पद हालचाली करताना दिसला.
तो बाहेर पडत असताना त्याच्या हातातील खरेदी केलेली कपड्यांची प्लास्टिक पिशवी पोलिसांच्या नजरेत कैद झाली. त्यामुळे जवळपास शॉपिंग सेंटरमधून तो जाऊन आल्याचे पोलिसांना समजले.
पिशवीवरील शॉपिंग सेंटरच्या लॉयल्टी कार्डच्या आधारे आरोपींचा मोबाइल क्रमांक मोहितेंनी मिळवला. त्याच्याआधारे पोलिसांनी या त्रिकूटाचा पर्दाफाश करण्यास मदत झाली. त्याच एटीएममधून १,२,१०,११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी स्किमर लावून पैसे गायब केल्याचे समोर आले होते. या एटीएममधून पैसे काढल्याच्या तब्बल १७ तक्रारी समोर आल्या होत्या.