मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल वृद्ध पालकांच्या भरपाईला कात्री
By admin | Published: November 10, 2015 02:10 AM2015-11-10T02:10:09+5:302015-11-10T02:10:09+5:30
भिवंडीजवळील कोन गावातील एका वृद्ध दाम्पत्यास त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल ठाण्याच्या मोटार अपघात भरपाई दावा न्यायाधिकरणाने मंजूर
मुंबई : भिवंडीजवळील कोन गावातील एका वृद्ध दाम्पत्यास त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल ठाण्याच्या मोटार अपघात भरपाई दावा न्यायाधिकरणाने मंजूर केलेल्या भरपाईत उच्च न्यायालयाने अपिलात ३५ लाखांची कपात करून या दाम्पत्यास २६ लाख ४५ हजार रुपयांची सुधारित भरपाई मंजूर केली आहे.
न्यायाधिकरणाने मयताचे अपघताच्या वेळचे वय आणि त्याचे भविष्यातील संभाव्य उत्पन्न यांच्या गुणोत्तरावर भरपाईची रक्कम ठरवून चूक केली. त्याऐवजी मयतच्या पालकांचे अपघाताच्या वेळचे वय गृहीत धरून भरपाई काढायला हवी होेती, असे नमूद करून न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने भरपाईचा फेरहिशेब केला. न्यायाधिकरणाने ६१ लाख ५५ हजार भरपाई मंजूर केली होती. उच्च न्यायालयाने ती कमी करून २६ लाख ४५ हजार रुपये केली.
ज्या ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने या दाम्पत्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता तो ट्रक अजमेर येथील कमरुद्दीन एस. खान यांच्या मालकीचा होता. भरपाई दाव्यात ट्रकचालक हजर न झाल्याने ट्रकचा विमा उतरविणाऱ्या न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीनेच दाव्यात प्रतिवाद केला होता. विमा कंपनीनेच केलेले अपील मंजूर करून उच्च न्यायालयाने भरपाईची रक्कम कमी केली. भरपाईच्या या रकमेवर दावा दाखल केल्यापासून म्हणजे २००९ पासून ९ टक्के दराने व्याजही द्यावे लागेल. भरपाईपैकी काही रक्कम या दाम्पत्यास रोख मिळेल व बाकीची रक्कम त्यांच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाईल. रामराव लाला बोरसे व सुशिला असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते कल्याण-भिवंडी रस्त्यावरील कोन गावात नाईकवाडीत राहतात. गावातील काही मंडळींसोबत त्यांच्या २९ वर्षांचा मुलगा खासगी बसने एका लग्नासाठी अमळनेर येथे गेला होता. तेथून परत येत असताना १९ फेब्रुवारी २००६ रोजी समोरून भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या दीपकचे नंतर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते.
दीपक भिवंडी येथे शिशुविहार एज्यु. सोसायटीतर्फे दादासाहेब दांडेकर विद्यालयात इंग्रजीचा शिक्षक म्हणून हंगामी नोकरीस होता. अकाली मृत्यू झाला नसता तर दीपक नोकरीत कायम झाला असता व त्याला सहाव्या वेतन आयोगानुसार दरमहा ४० हजार रुपये पगार मिळाला असता. कायद्यानुसार या हिशेबाने मिळणारे ५० टक्के भावी उत्पन्न खंडपीठाने भरपाईसाठी गृहित धरले. तसेच मुलाच्या अपघाती मृत्यूच्या वेळी आई-वडिलांचे सरकारी वय ६१ वर्षे होते. म्हणजेच किमान सात वर्षे त्यांना मुलाचा आधार मिळाला असे मानून ५० टक्के भावी उत्पन्नाला सातने गुणून भरपाईची रक्कम ठरविली. न्यायाधिकरणाने दीपकचे वय हा आधार मानला होता व तो आणखी १७ वर्षे नोकरी करू शकला असता असे गृहित धरून १७ने गुणून भरपाई ठरविली होती. (विशेष प्रतिनिधी)