आभाळ फाटलंय, पण शिवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - मुख्यमंत्री
By Admin | Published: June 27, 2017 06:57 PM2017-06-27T18:57:25+5:302017-06-27T18:57:25+5:30
असलेली वित्तीय तूट, आता कर्जमाफी यामुळे राज्य सरकारसाठी आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे. मात्र आम्ही हे फाटलेले
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा पडणार आहे. आधीच असलेली वित्तीय तूट, आता कर्जमाफी यामुळे राज्य सरकारसाठी आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे. मात्र आम्ही हे फाटलेले आभाळ शिवल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. शेतकरी संपामध्ये केंद्रस्थानी असलेल्या पुणतांब्यातील संपात सहभाग घेणाऱ्या 40 गावांतील शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.
सह्याद्री अतिथीगृहात शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले. "आम्हाला कर्जमाफी करायचीच होती. त्यामुळेच ही कर्जमाफी झाली आहे. जर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नसती तर सरकारने वेगवेगळी कारणे पुढे करून कर्जमाफी नाकारली असती." राज्य सरकारने अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत केलीच, पण नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही मदत केली. इतर राज्यांनी असे केले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.
आर्थिक स्थिती बघता 15 हजार कोटी रुपयांपलीकडे कर्जमाफी देण्यात येऊ नये, अशी सूचना वित्तविभागाने केली होती. मात्र सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले. तसेच समृद्धी महामार्गाल विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला.