स्काय बुक ३६० प्रणालीचे महिनाअखेरीस लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 05:52 AM2019-01-17T05:52:17+5:302019-01-17T05:52:24+5:30

एव्हिएशन व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठरणार साहाय्यभूत; विमानतळ, प्रशासनाबाबतची माहिती मिळणार एका क्लिकवर

SkyBook 360 system launches by month-end | स्काय बुक ३६० प्रणालीचे महिनाअखेरीस लोकार्पण

स्काय बुक ३६० प्रणालीचे महिनाअखेरीस लोकार्पण

Next


खलील गिरकर 
मुंबई : विमानतळ, विमानतळ प्रशासनाबाबत समग्र माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी व हवाई वाहतूक व्यवस्थापनासमोरील विविध आव्हानांचा यशस्वी सामना करण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी स्काय बुक ३६० ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या प्रणालीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडिया (एएआय)ने ही प्रणाली तयार केली आहे.


हवाई वाहतूक हा अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचा विषय आहे. त्याचे व्यवस्थापन करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. स्काय बुक ३६० या इंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग (ईआरपी)द्वारे या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी साहाय्य मिळेल. यामुळे कामामध्ये अधिक पारदर्शकता येईल, कामाचा वेग वाढेल, कोणती फाईल नेमकी कोणत्या ठिकाणी प्रलंबित आहे, त्यावर कोणता शेरा आहे, याची सर्व माहिती तत्काळ (रिअल टाइम) मिळेल. देशात सर्वप्रथम महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएडीसी)मध्ये या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही प्रणाली वेबवर आधारित आहे.

अकाउंटिंग, आर्थिक व्यवस्थापन, कार्गो, ग्राउंड हॅण्डलिंग, आर्थिक बाबी, मनुष्यबळ याविषयीची माहिती तसेच इतर क्लिष्ट माहितीचे आदानप्रदान करून समस्येवर मार्ग काढण्यात येईल, असे सांगण्यात आले. एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियातर्फे देशातील १२९ विमानतळांचे व्यवस्थापन केले जाते व त्यामध्ये ९.६ दशलक्ष चौ. किमी अंतराचा समावेश आहे. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर एएआयचे सर्व विभाग एकमेकांशी जोडले जातील. यामुळे सध्या उद्भवत असलेल्या त्रुटी, अनियमितता, विलंब टळेल व रिअल टाइम निकाल मिळेल तसेच यामध्ये मानवी हस्तक्षेपही कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेमध्ये याबाबत सप्टेंबर महिन्यात वर्किंग पेपर सादर करण्यात आला आहे. हवाई वाहतूक व्यवस्थापन, कोणत्याही घटनेचा अहवाल, टर्मिनलच्या वापराची माहिती, वाहतुकीची माहिती, आर्थिक माहिती, रोख रकमेचे व्यवस्थापन, महसूल व खर्च या सर्वाची माहिती क्लिकवर मिळेल.

ताणतणाव दूर करण्यासाठी मार्गदर्शन
ग्लोबल एव्हिएशन परिषदेत बुधवारी एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाने तयार केलेल्या ‘स्काय फिट’ या मोबाइल अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, राज्यमंत्री जयंत सिन्हा, सचिव राजीव चौबे, सह सचिव डॉ. शेफाली जुनेजा व एएआयचे उप महाव्यवस्थापक चंद्रशेखर तिवारी उपस्थित होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून हवाई प्रवासाशी संबंधित सर्व व्यक्ती जोडल्या जातील. वैमानिक, हवाई वाहतूक नियंत्रक, प्रवासी, केबिन क्रू, ग्राउंड कर्मचारी आदींना या अ‍ॅपच्या माध्यमातून ताणतणाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. तंत्रज्ञान व प्राचीन योगा पद्धतीचा मिलाफ यात आहे.

Web Title: SkyBook 360 system launches by month-end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान