स्लॅब कोसळून २५ प्रवासी नाल्यात
By Admin | Published: June 1, 2016 04:21 AM2016-06-01T04:21:32+5:302016-06-01T04:21:32+5:30
वसई रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ जवळ असलेल्या नाल्यावरील स्लॅब कोसळून २५ प्रवासी सात फूट खोल नाल्यात पडून जखमी झाले.
वसई : वसई रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ जवळ असलेल्या नाल्यावरील स्लॅब कोसळून २५ प्रवासी सात फूट खोल नाल्यात पडून जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी घडली. २ जणांवर वसईच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गाडी पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे अनेक प्रवासी रेल्वे फलाटाच्या बाहेर असलेल्या नाल्यावर सावलीत उभे होते. लोकलची वेळ झाल्याने सर्वजण जिना चढू लागले. तेव्हाच नाल्यावरील स्लॅब कोसळला व त्यावर उभे असलेले सुमारे २५ प्रवासी सात फूट खोल नाल्यात कोसळले. यातील जिग्नेश नायर आणि मनीष केदारे जखमी झाले. त्यांना आनंदनगर येथील रवि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आनंद याला किरकोळ मार लागल्याने उपचार करून सोडण्यात आले.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे प्रमुख भरत गुप्ता, नगरसेवक वृंदेश पाटील, अग्निशमन दलाचे जवान, रेल्वे प्रशासन अधिकारी दाखल झाले. त्यानंतर नाला व जिना बंदिस्त करण्यात आला. सकाळी लोअर परेल स्थानकाजवळ एक्सप्रेस गाडीचा डबा रुळावरून घसरल्याने पश्चिम रेल्वेची उपनगरीय वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प झाली होती. त्यात वसई रोड रेल्वे स्थानकातील सकाळची आठ वाजून अठरा मिनिटांची लोकल रद्द केल्याने प्रवाशांनी ८ वाजून ४४ मिनिटांची लोकल पकडण्यासाठी प्रवाशांनी फलाट क्र.१ वर गर्दी केली होती. ही लोकल फलाटावर आल्यानंतर झुंबड उडाली. फलाट क्र.१ वरून आनंदनगरकडे जाण्यासाठी गटारावर स्लॅब बांधून त्यावर जिना तयार करण्यात आला आहे. स्लॅबवर प्रवाशांचा भार येऊन हा स्लॅब कोसळला. तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने या गटारावरील स्लॅबचे बांधकाम केले होते. तर रेल्वे प्रशासनाने वर्षभरापूर्वी स्लॅबवर जीना बांधला होता. या दुर्घटनेनंतर दोन्ही प्रशासनांनी हात झटकले. दुर्घटनेची कोणी नोंद करायची यावरून माणिकपूर पोलीस व रेल्वे पोलिसांमध्ये हद्दीचा वाद झाल्याचे दिसून आले. हा नाला पालिकेने २० वर्षांपूर्वी बंदीस्त केला होता. ‘गाडीची वाट पाहत सावलीत उभे होतो. पूल चढताना स्लॅब कोसळून आम्ही नाल्यात पडलो,’ असे जिग्नेश नायर या प्रवाशाने सांगितले.