राज्यात किंचित गारवा; मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 02:42 AM2018-11-24T02:42:23+5:302018-11-24T02:42:37+5:30
शुक्रवारी नागपूर येथे राज्यात सर्वात कमी किमान तापमान १३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, उर्वरित शहरांचे किमान तापमानही १५ अंशांच्या आसपास आहे. तर मुंबईचे किमान तापमान मात्र २३ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
मुंबई : शुक्रवारी नागपूर येथे राज्यात सर्वात कमी किमान तापमान १३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, उर्वरित शहरांचे किमान तापमानही १५ अंशांच्या आसपास आहे. तर मुंबईचे किमान तापमान मात्र २३ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. परिणामी मुंबई वगळून राज्याला हुडहुडी भरली असून, मुंबईकरांना अजूनही थंडीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मुंबईचा विचार करता २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २३ अंशांच्या आसपास राहील. २४ नोव्हेंबर रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहील. २५ नोव्हेंबर रोजी आकाश मुख्यत: अंशत: ढगाळ राहील.
मुंबईचे किमान तापमान अगदी सुरुवातीला १८ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत होते. मात्र कालांतराने यात वाढ झाली. किमान तापमान २१ अंशांवर दाखल झाले. मात्र दोनएक दिवस पुन्हा ते १८ अंशांवर घसरले. आता पुन्हा किमान तापमान २३ अंशांवर दाखल झाले आहे. किमान तापमान सातत्याने खाली-वर होत असल्याने हवामानातील बदलाचा मुंबईकरांना फटका बसत आहे. परिणामी मुंबईकर त्रस्त असून, उत्तरेकडून जोवर शीत वारे दक्षिणेकडे वाहत नाहीत तोवर मुंबईत पुरेशी थंडी पडणार नसल्याचे चित्र आहे.