यूपीमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2016 05:20 AM2016-11-18T05:20:18+5:302016-11-18T05:20:18+5:30
३६व्या कुमार - मुली (१८ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो - खो स्पर्धेत एकहाती वर्चस्व राखताना बलाढ्य महाराष्ट्राने दुहेरी विजेतेपदाची कामगिरी केली.
मुंबई : आझमगढ (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या ३६व्या कुमार - मुली (१८ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो - खो स्पर्धेत एकहाती वर्चस्व राखताना बलाढ्य महाराष्ट्राने दुहेरी विजेतेपदाची कामगिरी केली. महाराष्ट्राने कुमार गटात बलाढ्य कोल्हापूरला नमवले. तर, मुलींमध्ये महाराष्ट्राने कर्नाटकला धक्का देत बाजी मारली.
विशेष म्हणजे २००९ सालापासून या स्पर्धेत कुमार गटात अपराजित असलेल्या महाराष्ट्राचे हे सलग आठवे विजेतेपद ठरले. त्याचबरोबर वैयक्तिक पुरस्कारांवरही महाराष्ट्राने वर्चस्व राखताना कुमार गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार तेजस मगरने पटकावला. तर, मुलींच्या गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या जानकी पुरस्कारावर अपेक्षा सुतारने कब्जा केला.
कुमार गटात महाराष्ट्राने तुल्यबळ कोल्हापूरचे आव्हान १०-४, १-६ असे ११-१० गुणांनी व ७ मिनिटे राखून परतावले. मध्यंतराला घेतलेली ६ गुणांची आघाडी महाराष्ट्राने निर्णायक ठरवली. दुसऱ्या सत्रात कोल्हापूरने जबरदस्त वर्चस्व राखले. मात्र, महाराष्ट्राने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना कोल्हापूरला नमवले. तेजस मगर आणि संकेत कदम यांनी निर्णायक अष्टपैलू खेळ करुन महाराष्ट्राच्या विजयात \योगदान दिले. विश्वजीत फारणे व आशिष बने यांनी भक्कम बचाव केला. कोल्हापूरच्या डेव्हीड कदमने ५ बळी घेत एकाकी झुंज दिली. (क्रीडा प्रतिनिधी)