मुलीपाठोपाठ काळाची पालकांवरही झडप
By admin | Published: May 9, 2014 02:00 AM2014-05-09T02:00:57+5:302014-05-09T02:00:57+5:30
नियती कशी झडप घालेल, याचा नेम नाही़ अपघातग्रस्त मुलीचा मृतदेह घरी नेत असताना आईवडिलांच्या वाहनावर काळाने झडप घातली
रत्नागिरी : नियती कशी झडप घालेल, याचा नेम नाही़ अपघातग्रस्त मुलीचा मृतदेह घरी नेत असताना आईवडिलांच्या वाहनावर काळाने झडप घातली आणि अवघ्या पाच तासांत अवघं कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले़ संगमेश्वर व पानवलमधील या गुरुवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चार जण ठार झाले. पहाटे झालेल्या रिक्षा अपघातात युवतीचा मृत्यू झाला आणि काही तासांनी तिचा मृतदेह घरी नेण्याआधी तिच्या माता-पित्याच्या कारवर जेसीबी पडला आणि मुलीपाठोपाठ त्या दोघांची प्राणज्योतही मालवली. धनश्री प्रवीण कदम (१७), प्रवीण रामचंद्र कदम (४०), पत्नी प्रियंका (३८), नरेश गणपत देवरुखकर (५० कारमालक ) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी कदम दाम्पत्य पहाटे साडेचार वाजता धनश्रीसह रिक्षाने खेडहून रत्नागिरीत येत होते. सकाळी ६.४५ वाजता संगमेश्वर येथे रिक्षाला अपघात झाला. रिक्षाखाली सापडून धनश्री जागीच ठार झाली. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तिला मृत घोषित केल्यानंतर तेथेच शवविच्छेदन करण्यात आले. तिचा मृतदेह घेऊन परतत असताना त्यांच्या कारवर जेसीबी इंजीन पडल्याने कदम दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी) दुसर्यांदा काळाने गाठलेच संगमेश्वर येथील रिक्षा अपघातात वाचलेले धनश्रीचे माता-पिता प्रियंका व प्रवीण कदम हे पानवलजवळ झालेल्या कार अपघातात मृत्युमुखी पडले. कारचा चेंदामेंदा झाला होता. झुडुपाच्या एका लहानशा फांदीवर प्रियंका यांचे मंगळसूत्र अडकलेले पोलिसांना आढळले.