फास्टॅगचा पहिल्याच दिवशी राज्यात फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 06:43 AM2019-12-16T06:43:19+5:302019-12-16T06:43:32+5:30
वाहनांच्या रांगा : नेटवर्कअभावी टोल घेण्यास विलंब; प्रवाशांना मनस्ताप
खेड शिवापूर (जि. पुणे) : नेटवर्क अभावी अनेक वाहनचालकांनी फास्टॅग न लावल्याने आणि टोल नाक्यांवर लेनचे योग्य नियोजन नसल्याने फास्टॅग यंत्रणेचा राज्यात पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
टोल नाक्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी, तसेच वाहनांचा वेग वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्यातील सर्वच टोल नाक्यांवर रविवारपासून फास्टॅगची सुविधा सुरू केली. पुणे जिल्ह्यात मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग, जुना मुंबई पुणे मार्ग, खेडशिवापूर, पाटस टोलनाका, राजगुरूनगर या नाक्यांवर ही यंत्रणा सुरू करण्यात आली.
वेगाने टोलवसुलीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्यातील सर्वच टोल नाक्यांवर फास्ट गो यंत्रणा राबविण्याची घोषणा केली होती. ही यंत्रणा १ डिसेंबरपासून लागू होणार होती. मात्र, अनेक टोल यासाठी सज्ज नसल्याने मुदतवाढ देऊन रविवारपासून तिची अंमलबजावणी झाली. मात्र, नियोजनाअभावी वाहतूक संथगतीने होत होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. ही यंत्रणा आॅनलाइन आहे. मात्र, अनेक टोल नाक्यांवर नेटवर्कच नव्हते. वाहने पाच ते सात मिनिटे एकाच ठिकाणी थांबून होती.
बहुतांश वाहन मालकांनी फास्टॅग न बसविल्याने टोल नाक्यांवर बराचसा विस्कळीतपणा जाणवला. दहापैकी फास्टॅगसाठी पाच व रोखीने टोल भरणा करणाऱ्यांसाठी प्रत्येकी पाच लेन राखीव आहेत, अशी माहिती शनिवारी टोल प्रशासनाने दिली होती.