प.रे.ची घसरगुंडी; प्रवाशांची गैरसोय
By Admin | Published: June 1, 2016 04:26 AM2016-06-01T04:26:18+5:302016-06-01T04:26:18+5:30
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होत असतानाच पश्चिम रेल्वेकडूनही तोच कित्ता गिरविण्यात आला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लांब पल्ल्याच्या ट्रेनचा एक डबा डाउन धीम्या
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होत असतानाच पश्चिम रेल्वेकडूनही तोच कित्ता गिरविण्यात आला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लांब पल्ल्याच्या ट्रेनचा एक डबा डाउन धीम्या मार्गावर लोअर परळ स्थानकाजवळ घसरला आणि त्यामुळे पश्चिम रेल्वे मंगळवारी सकाळपर्यंत विस्कळीत झाली. हा डबा बाजूला करण्यास पश्चिम रेल्वेला तब्बल नऊ तास लागले आणि या घटनेमुळे १00 पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. घसरलेला डबा हा भंगारात काढण्यात आलेला होता, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
१९ डब्यांची लांब पल्ल्याची एक रिकामी ट्रेन सोमवारी मध्यरात्री
सव्वा दोन वाजता लोअर परेल कारशेडमधून लोअर परेलच्याच कार्यशाळेत जात होती. ही ट्रेन कारशेडमधून बाहेर पडताच, कार्यशाळेत जाण्यासाठी डाउन (वान्द्रे दिशेने) धीम्या मार्गावर आली असता, तिचा इंजिनकडून असलेला दुसरा
डबा रुळावरून घसरला. ही घटना घडताच रेल्वेच्या कर्मचारी आणि कामगारांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, डबा हटविण्यासाठी १४0 टनाची क्रेन पश्चिम रेल्वेकडे नसल्याने त्यासाठी मध्य रेल्वेची मदत घेण्यात आली.
मध्य रेल्वेकडून ही ट्रेन दादरमार्गे देण्यात आली आणि क्रेन पश्चिम रेल्वेवर घेताना बरीच कसरत करावी लागली. त्यासाठी जवळपास मंगळवारचे पहाटेचे साडेसहा वाजले आणि त्यानंतरच डबा हटविण्याचे काम सुरू झाले, तोपर्यंत डाउन धिम्या मार्गावरील लोकल सेवेचा बोजवाराच उडाला आणि त्यापाठोपाठ अप धिम्या मार्गालाही त्याचा फटका बसला. या दोन्ही मार्गांवरील लोकल फेऱ्या जलद मार्गांवर वळविण्यात आल्या. त्यामुळे धिम्या आणि जलद लोकल तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. उशिराने धावत असलेल्या लोकलमुळे सर्व स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. हा मार्ग पूर्ववत झाल्यानंतर डाउन धिम्या मार्गावरीलही अन्य तांत्रिक कामे पूर्ण करून साधारण सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हादेखील मार्ग सुरू करण्यात आला. मध्य रेल्वे सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. या विरोधात मनसेकडून मध्य रेल्वेच्या मुख्यालयातच आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी केले. या वेळी एक निवेदनही त्यांच्याकडून मध्य रेल्वेला देण्यात आले. रेल्वेचे वाढते अपघात, रेल्वेमधील महिलांवरील अत्याचार, महिला शौचालयाची दुरवस्था, प्रवाशांचे होणारे हाल अशा विविध विषयांवर मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांच्या नेतृत्त्वाखाली चर्चगेट रेल्वे स्थानकात निदर्शने करण्यात आली. रेल्वेच्या समस्यांबाबत रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. (प्रतिनिधी)पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरला. डबा बाजूला करण्यात आल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या. घसरलेला डबा हा भंगारात काढण्यात आला होता. तो एका ट्रेनला जोडून कार्यशाळेत नेण्यात येत होता, तेव्हाच ही घटना घडली. तरीही घटनेमागचे नेमके कारण चौकशीनंतरच समोर येईल.
-रवींद्र भाकर, पश्चिम रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी