थोडी कळ सोसा!
By admin | Published: April 3, 2017 05:35 AM2017-04-03T05:35:14+5:302017-04-03T06:05:21+5:30
शिवसेना आमदारांना ‘थोडी कळ सोेसा’ असा सबुरीचा सल्ला देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत फेरबदलाचे संकेत दिले.
मुंबई : अपुरा विकासनिधी आणि स्वपक्षाच्या मंत्र्याकडून कामे होत नसल्यामुळे वैतागलेल्या शिवसेना आमदारांना ‘थोडी कळ सोेसा’ असा सबुरीचा सल्ला देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत फेरबदलाचे संकेत दिले.
राज्यात सत्ताधारी पक्ष असूनही शिवसेना आमदारांना भाजपा आमदारांच्या तुलनेत खूप कमी निधी मिळतो. शिवाय, शिवसेनेचे मंत्रीसुद्धा आमची कामे करीत नाहीत, अशी खंत शिवसेना आमदारांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली होती. आमदारांच्या नाराजीची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांशी सविस्तर चर्चा केली. उद्धव यांनी आमदारांकडून मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल आढावा घेतला. या वेळी शिवसेना आमदारांच्या नाराजीची दखल घेत येत्या काळात योग्य ती कारवाई केली जाईल, अशा शब्दांत उद्धव यांनी आमदारांची समजूत काढली.
शिवसेनेचे आमदार सेना मंत्र्यांच्या कामगिरीवर कामालीचे नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत आमदारांनी आपल्याच मंत्र्यांना खडे बोल सुनावले होते. मतदारसंघात फिरताना लोकांनी आमदारांचे कपडे काढण्याचे बाकी राहिले आहे, अशा शब्दांत आमदारांनी मंत्र्यांवर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक झाली.
या बैठकीत ग्रामीण भागात नव्याने पक्षबांधणी, केंद्रातील भूमिका, आमदारांच्या मतदारसंघातील कामे आणि पुढील निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी आदी विषयांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)
> ग्रामीण भागातील आमदारांना संधी मिळेल?
आपापल्या भागात प्रभाव दाखवू न शकलेल्या नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागल्याबद्दल सुरुवातीपासून शिवसेना आमदारांमध्ये नाराजी होती. विशेषत: मुंबईबाहेरील आमदारांनी मोदी लाटेतही शिवसेनेचा भगवा फडकवला. तरीही विधान परिषद सदस्य असणाऱ्यांना मंत्रिपदे देण्यात आली. मंत्री झाल्यावरही या नेत्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केला नाही.
त्याचाच फटका अलीकडच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला बसल्याचा आरोप आमदारांनी केला होता. त्यामुळे आता तरी ग्रामीण भागातील आमदारांना संधी मिळणार का, की पुन्हा ‘मातोश्री’शी जवळीक असणाऱ्या नेत्यांनाच संधी मिळणार, अशी चर्चा शिवसेना आमदारांमध्ये आहे.