मुंबई स्लो ट्रॅकवर, मुसळधार पावसामुळे वाहतूक कोलमडली
By admin | Published: July 2, 2016 05:05 PM2016-07-02T17:05:38+5:302016-07-02T17:05:38+5:30
मुंबईत सतत सुरु असलेल्या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक स्लो ट्रॅकवर आली असून अनेक ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 02 - शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने अद्यापही उसंत घेतलेली नाही. सलग सुरु असलेल्या पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाल्याने नेहमी धावणा-या मुंबईचा वेग मंदावला आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक स्लो ट्रॅकवर आली असून अनेक ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. तिनही मार्गावरील रेल्वे वाहतूक उशिराने सुरु आहे.
हार्बर मार्गावर रे रोड आणि डॉकयार्ड स्टेशन दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. हार्बरच्या अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचा वेग मंदावला आहे. तर पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक साधारणपणे 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरु आहे.
मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे हिंदमाता आणि घाटकोपरमध्येही पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पाऊस थांबत नसल्याने पाण्याची पातळी वाढत असून पालिका कर्मचा-यांनी कसरत करावी लागत आहे. घाटकोपरहून बीकेसीला जाणारा मार्ग, पवई, सायन, मांटुग्यातही वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दादर, परळ, सातरस्ता भागातही वाहतूक कोंडी झाली आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावर अमर महाल जंक्शनजवळ ट्रक उलटल्याने कुर्ल्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. तर पश्चिम उपनगरांत मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेद मंदवला आहे. याशिवाय नवी मुंबईत रात्रीपासून थांबून-थांबून मुसळधार पाऊस सुरु आहे.
Incessant rains in Mumbai causes traffic jam and water logging causing a lot of distress to the locals. pic.twitter.com/Vq9J6Nc7jM
— ANI (@ANI_news) July 2, 2016