हळू हळू बंडाचे खरे स्वरुप लोकांसमोर येतेय; दीपक केसरकरांची गद्दार दिनावर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 10:23 AM2023-06-20T10:23:54+5:302023-06-20T10:24:17+5:30
आज नवी मुंबईतील खारघरमध्ये रन फॉर एज्युकेशन रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केसरकर यांनी हजेरी लावली.
80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण बाळासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे ते वागले नाहीत. ते शंभर टक्के राजकारण करतात. त्यांनी गद्दार दिन जरूर साजरा केलाच पाहिजे कारण त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायावर लोळण घेतली. त्यामुळे त्यांनी गद्दार दिन साजरा करावा. हळू हळू बंडाचे खरे स्वरुप लोकांसमोर येत आहे. हे बंड स्वाभिमानासाठी झाले होते, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
आमचा असा एक नेता जो विधानसभेला नेता होता. आमदारांचे सुख दुःख जाणून घ्यायचा. आमदार आजारी पडले की अॅम्बुलन्स पाठवायचा. अशा नेत्याला डावललं गेलं. त्यांनी कार्यकर्त्यांना अधिकच प्रेम दिले. मात्र ठाकरेंकडून प्रेम मिळाले नाही. आमच्यासारखे आमदार दोन दोन तीन महिने वर्षाच्या बाहेर उभे राहिले, हा आमचा अपमान नाही का असा सवाल केसरकर यांनी विचारला.
आज नवी मुंबईतील खारघरमध्ये रन फॉर एज्युकेशन रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केसरकर यांनी हजेरी लावली. ज्याप्रकारे मोदींना स्टेजवरून बोललं जातं, ते योग्य नाही. बाळासाहेब म्हणाले होते मला एक दिवसासाठी पंतप्रधान बनवा मी 370 कलम रद्द करून दाखवतो, राम मंदिर बांधून दाखवतो. तेच मोदींनी केले बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी साकार केले आणि त्यांच्यावर अशा प्रकारे टीका करणे योग्य नाही. बाळासाहेबांना हे मान्य आहे का. ही युती बाळासाहेबांनी केली आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार महाराष्ट्राला अखंड ठेवण्यासाठी शिवसेना-भाजप युती कटिबद्ध आहे. मोदी, शहा यांचे नेतृत्वाखाली भारताला मजबूत करण्यासाठी आमची युती आहे, असे केसरकर म्हणाले.
खाजगी शाळांच्या फीवर नियंत्रण नाही...
खाजगी शाळांच्या फीवर आमचे नियंत्रण नसते. मात्र कोरोना काळात ज्या शाळांनी दाखले द्यायला नकार दिला, तेव्हा मी इतर शाळांत प्रवेश घेताना विना दाखला प्रवेश दिला जावा असा जीआर काढला. मात्र ज्या ठिकाणी चुकीचे घडत असेल त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी एक समिती बनवली आहे. इतर सरकारी शाळांप्रमाणे खाजगी शाळांच्या ऑडिट मागवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाईल, असे केसरकर म्हणाले.