झोपडपट्टी पुनर्वसन अखेर बारगळले
By Admin | Published: June 27, 2016 01:33 AM2016-06-27T01:33:37+5:302016-06-27T01:33:37+5:30
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत दळवीनगर झोपडपट्टीमधील नागरिकांना हक्काची घरे मिळण्याचे स्वप्न धूसर झाले आहे
चिंचवड : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत दळवीनगर झोपडपट्टीमधील नागरिकांना हक्काची घरे मिळण्याचे स्वप्न धूसर झाले आहे. अनेक आश्वासनानंतरही हा प्रकल्प अद्याप सुरू झाला नसल्याने प्रभागातील नागरिक नाराज आहेत.
या प्रभागात वेताळनगर, मोरयानगर झोपडपट्टीचाही भाग समाविष्ट आहे. मात्र येथेही मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
या प्रभागात शहरातील पहिल्या वॉर्ड सेंटर प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. मात्र, आरक्षित भूखंड विकसित झाले नाहीत. हे भूखंड ताब्यात घेतले असून, लवकरच कामे पूर्ण करणार असल्याचे सांगितले जात आहे.
कामदा हौसिंग सोसायटी, संतोषनगर, उद्योगनगर, दळवीनगर,भोईरनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्क हा महत्त्वाचा रहिवासी भाग या प्रभागात येतो. मात्र येथील मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही ही मुख्य समस्या आहे. उद्योगनगरमधील महाराष्ट्र कामगार मंडळाच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत असणारे मैदान आठ वर्षांपासून बंद झाले. या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांना तात्पुरते पत्राशेड टाकण्यात आले होते. यामुळे येथील मैदान बंद झाले आहे.
भोईरनगर चौकात असणाऱ्या भाजी मंडईचे स्थलांतर अद्याप झालेले नाही. यामुळे येथील समस्या गंभीर झाली आहे. भाजीविक्रेते रस्त्यावर थांबत असल्याने वाहतूककोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
प्रभागात पुरेशी स्वच्छतागृह नाहीत. जी आहेत त्यांची दुरवस्था झाली आहे. भोईरनगर चौकातील स्वच्छतागृह काढण्यात आले. मात्र, ते पुन्हा बसविण्यात आले नाही.
प्रभागात विद्युत केबल भूमिगत करण्याचे काम सुरू केले. मात्र, अद्यापपर्यंत काही भागातील कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. प्रभागात २४ तास पाणी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत ते पूर्ण झालेले नाही. संतोषनगर, प्रेमलोक पार्क भागात कचराकुंड्या वेळेवर साफ होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. पादचारी मार्गांची कामे अर्धवट झाली आहेत. झोपडपट्टी भागात वेळोवेळी साफ-सफाई होत नाही. (वार्ताहर)
सुसज्ज रस्ते, मुबलक पाणी यासाठी कामे झाली आहेत. वॉर्ड सेंटरचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. पांढरकर कॉलनीत प्राथमिक शाळा, सुसज्ज उद्यान व स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे. स्वच्छ भारत अभियान प्रकल्प राबविला आहे. प्रेमलोक पार्कमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा सुरू झाली आहे. आरक्षित भूखंड ताब्यात घेतले आहेत.
- शमीम पठाण, नगरसेविका
।प्रभागात रस्त्यांची कामे केली आहेत. पादचारी मार्गाचेही काम झाले आहे. प्रेमलोक पार्कमध्ये विरंगुळा केंद्र सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉलची व्यवस्था केली आहे. वॉर्ड सेंटरचे काम सुरू केले आहे. झोपडपट्टी भागात सुलभ स्वच्छतागृहाची कामे झाली आहेत. रस्त्याचे सुशोभीकरण झाले आहे.
- गणेश लोंढे, नगरसेवक