रिकामटेकडी मंडळी जातीय विष पेरत आहेत; नितीन गडकरी यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:44 AM2018-04-20T01:44:32+5:302018-04-20T01:44:32+5:30
मुस्लिमांपुढे ‘इस्लाम खतरे में हैै’ची, तर दलितांना राज्यघटना बदलण्याची भीती दाखवली जात आहे़
नांदेड/परभणी : केंद आणि राज्यातील भाजपा सरकार विकासाचा अजेंडा राबवित असताना काही रिकामटेकडी मंडळी समाजात जातीय विष पेरण्याचे काम करत आहेत, अशी टीका केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोणाचेही नाव न घेता केली.
लोहा येथे गुरुवारी तीन राष्ट्रीय महामार्गांचा भूमीपूजन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला़ यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, सरकार विकास कामे करत असताना काही मंडळी जातीयवादाचे विष पसरवण्याचे प्रयत्न करत आहेत़ मुस्लिमांपुढे ‘इस्लाम खतरे में हैै’ची, तर दलितांना राज्यघटना बदलण्याची भीती दाखवली जात आहे़ मराठवाड्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती़ मात्र त्याकाळात मराठवाड्याचा विकास होऊ शकला नाही़ लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागणे हे दुर्दैवी असल्याचे गडकरी म्हणाले.
तेव्हा तुम्ही काय केले?
परभणीत मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला़ त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, अरे नालायकांनो, १५ वर्षांत तुम्ही नीट वागला असतात तर या शेतकºयांची अशी अवस्था झाली असती का? ही कोणामुळे अवस्था झाली, याचं एकदातरी उत्तर तुम्ही दिले पाहिजे़ आम्हाला प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणात गोंधळ
परभणी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या महिलांनी शेतकºयांच्या आत्महत्येवरून गोंधळ घातला़ फडणवीस यांचे भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे या मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावत येत होत्या़ पाठोपाठ स्वाभिमानीच्या विद्यार्थी परिषदेच्या उपाध्यक्षा शर्मिला येवले याही मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावल्या़ काही अंतरावरच त्यांनाही पोलिसांनी रोखले़ शेतकरी स्वत: सरण रचून आत्महत्या करीत आहेत, तुम्ही मात्र इकडे उद्घाटन करीत फिरत आहात, अशा शब्दांत या महिलांनी आपले म्हणणे मांडले. त्यावर सभा संपल्यानंतर तुमचे म्हणणे ऐकून घेऊ, मला अशा घटनांची सवय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र तरीही आंदोलक ऐकायला तयार नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले.