महायुती, महाविकास आघाडीतील लहान पक्षांची जागांसाठी कसरत; सन्मान मिळत नसल्याने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:12 PM2024-10-26T12:12:21+5:302024-10-26T12:12:49+5:30

सहा प्रमुख पक्षांच्या जागा वाटपातील संघर्षात छोटे पक्ष दुर्लक्षित

Small parties in the Mahayuti, Mahavikas Aghadi vying for seats; Displeasure for not getting respect | महायुती, महाविकास आघाडीतील लहान पक्षांची जागांसाठी कसरत; सन्मान मिळत नसल्याने नाराजी

महायुती, महाविकास आघाडीतील लहान पक्षांची जागांसाठी कसरत; सन्मान मिळत नसल्याने नाराजी

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील सहा प्रमुख पक्ष सोडले तर त्यांच्याबरोबर लहान घटक पक्ष आहेत. या लहान पक्षांची काही ठराविक भागात व काही समाजात ताकद आहे. पण, विधानसभेच्या जागा वाटपात अजून तरी युती आणि आघाडीने या घटक पक्षांकडे आतापर्यंत दुर्लक्ष केल्याचेच चित्र आहे.

मविआकडे शेकाप, सपा, माकप, भाकप असे लहान घटक पक्ष आहेत. या पक्षांनी लोकसभा निवडणुकीत साथ दिल्याने मविआला त्याचा फायदा झाला होता.

मविआतील छोट्या पक्षांची काय स्थिती?

  • मविआबरोबर असलेल्या शेकापचा सध्या एकच आमदार आहे. रायगड जिल्ह्यातील पाच पारंपरिक मतदारसंघ मिळण्याची शेकापची अपेक्षा आहे. आघाडीकडून विशेष प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी या मतदारसंघात उमेदवारही घोषित केले आहेत. यातील अलिबाग, पेण, सांगोला, लोहा कंधार या चार ठिकाणी उद्धवसेनेने एबी फॉर्म दिले आहेत.  
  • समाजवादी पार्टीने मानखुर्द शिवाजीनगर (विद्यमान आमदार आबू आझमी), भिवंडी पूर्व (विद्यमान आमदार रईस शेख), भिवंडी पश्चिम (रियाज आझमी) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना मालेगाव, धुळे, अणुशक्तीनगर अशा मिळून सहा जागा हव्या आहेत. 
  • माकपने १२ जागांची मागणी केली आहे. पण कळवण (जिवा पांडू गावित) आणि डहाणू (विद्यमान आमदार विनोद निकोले) या दोनच जागा त्यांना दिल्या जाणार असल्याचे समजते. त्यांना या दोन जागांसह नाशिक पश्चिम आणि सोलापूर या जागाही हव्या आहेत.
  • सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने साक्री व बागलाण या दोन मतदारसंघांची मागणी केली आहे. मात्र, काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी यशवंत मालचे (साक्री), संजय निकम (बागलाण) व रणजीत गावित (नवापूर) या तीन उमेदवारांची घोषणा केली आहे.


महायुतीतील चित्र काय?

महायुतीतील महादेव जानकर, बच्चू कडू यांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. तर,  रामदास आठवले यांच्या रिपाइंने २० जागांची मागणी केली आहे. त्यांनी मागितलेल्या जागांपैकी धारावी, केज, मुखेड येथे  भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती रिपाइंला एकही जागा देण्याची शक्यता नाही. तर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांना जतमधून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत.

नाशिकमध्ये मनसेत उमेदवारीवरून बंडाळी

नाशिक पश्चिममधून मनसेने भाजपचे बंडखोर दिनकर पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे पक्षाचे माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज दिनकर पाटील यांनी बंडखोरी करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राज यांनी पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे नाराज दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला. दातीर मूळचे शिवसैनिक असून, २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन मनसेकडून निवडणूक लढविली होती.

Web Title: Small parties in the Mahayuti, Mahavikas Aghadi vying for seats; Displeasure for not getting respect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.