सोलापूरमध्ये ‘स्मार्ट सिटी’ कळीचा मुद्दा
By admin | Published: January 21, 2017 12:33 AM2017-01-21T00:33:30+5:302017-01-21T00:33:30+5:30
केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या टप्प्यातील २० शहरांची २८ जानेवारी २०१६ रोजी घोषणा केली.
राजकुमार सारोळे,
सोलापूर- केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या टप्प्यातील २० शहरांची २८ जानेवारी २०१६ रोजी घोषणा केली. त्यात नवव्या क्रमांकाने महाराष्ट्रात गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरचा समावेश झाला. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश होऊन वर्ष लोटले तरी एकाही कामाला सुरुवात न झाल्याने मनपा निवडणुकीत हा विषय कळीचा मुद्दा बनला आहे.
केंद्र शासनाच्या पहिल्या स्मार्ट २० शहरांच्या यादीत स्पर्धेचे ६०.३० टक्के गुण मिळवून सोलापूर शहर नवव्या क्रमांकावर आले. स्मार्ट सिटी योजनेमुळे पायाभूत सुविधांसाठी खास निधी उपलब्ध होणार असल्याने गिरणगावची वाटचाल विकासाच्या दिशेने होणार, अशी आशा निर्माण झाली. योजनेचे २८३ कोटी रुपये मनपाच्या खात्यावर आले; पण स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी, त्याचे संचालक मंडळ व त्याला सभेची मंजुरी आणि बैठकांत वेळ गेला. त्यामुळे अपेक्षित कामांना सुरुवात करता आली नाही. सध्या स्मार्ट सिटी प्रस्तावातील सर्व कामांचे प्रकल्प अहवाल तयार आहेत. टेंडरना मंजुरी नसल्याने आता निवडणुकीनंतर ही कामे सुरू होतील. पण प्राधान्याने कोणते प्रकल्प हाती घेतले, याकडे लक्ष वेधल्यास निवडणुकीत हा कळीचा मुद्दा बनणार आहे. लोकांचे आहे ते प्रश्न तसेच भिजत पडले आहेत. पाणी, रस्ते, कचरा संकलन या समस्यांवर मात करण्यात अपयश आल्याने समार्ट सिटीचे गाजर महागात पडणार आहे.
>या कामाला दिले प्राधान्य
केवळ अमृत योजनेतून निधी मंजूर झालेल्या किल्लाबाग सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. हा प्रकल्प पुरातत्त्व खात्याच्या मंजुरीत अडकला आहे. रंगभवन ते भैया चौक हा रस्ता स्मार्ट करण्याचा प्रकल्प अहवाल करण्यात येत आहे. वास्तविक, पाणी आणि कचरा संकलन या प्रकल्पाला प्राधान्य देणे गरजेचे होते.