सायबर हल्ल्याच्या रडारवर स्मार्ट सिटी

By Admin | Published: July 1, 2017 07:45 AM2017-07-01T07:45:23+5:302017-07-01T07:45:23+5:30

जेएनपीटीमधील सायबर हल्ल्यानंतर नवी मुंबईमधील माहिती तंत्रज्ञानासह सर्वच उद्योगविश्वामध्ये खळबळ उडाली आहे.

Smart City on cyber attack radar | सायबर हल्ल्याच्या रडारवर स्मार्ट सिटी

सायबर हल्ल्याच्या रडारवर स्मार्ट सिटी

googlenewsNext

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : जेएनपीटीमधील सायबर हल्ल्यानंतर नवी मुंबईमधील माहिती तंत्रज्ञानासह सर्वच उद्योगविश्वामध्ये खळबळ उडाली आहे. ओनाक्रायच्या व्हायरसपासून वाचण्यासाठीची उपाययोजना सुरू असताना आता पेंट्या व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. भविष्यातही नवी मुंबई, पनवेल परिसरातील माहिती तंत्रज्ञान, अर्थविषयक कंपन्या व मोठ्या उद्योगांसमोर सायबर हल्ल्यापासून बचाव करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनीही या गुन्ह्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले. खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
देशातील प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून नवी मुंबईची जगभर ओळख आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, ओएनजीसी व अनेक महत्त्वाचे उद्योग या परिसरामध्ये आहेत. डीएकेसी, पटनीसह शेकडो आयटी कंपन्याही नवी मुंबईमध्ये आहेत. एकेकाळी केमिकल झोन म्हणून ओळख असणाऱ्या औद्योगिक वसाहतीला आयटी सेक्टरचा दर्जा प्राप्त झाला आहे. रिझर्व्ह बँकेसह सर्वच वित्तीय संस्थांची कार्यालये या परिसरामध्ये आहेत. स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या पनवेल, नवी मुंबईमधील वाढत्या औद्योगिक साम्राज्यासमोर आता सायबर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. २७ जूनला जेएनपीटीच्या गेटवे टर्मिनल कंपनीवर सायबर हल्ला झाला.
जीटीआय कंपनीच्या माध्यमातून रोज ५ ते ६ हजार कंटेनर हाताळले जातात. २००४पासून उत्तमपणे काम करत असलेल्या या कंपनीमधील सर्व २७० संगणक व लॅपटॉपमध्ये पेंट्या व्हायरस शिरला असून सर्व कामकाज ठप्प झाले आहे. हॅकरने कंपनीकडे
एक संगणकामधील व्हायरस काढण्यासाठी ३०० डॉलरची खंडणी मागितली असून याविषयी गुन्हा दाखल झाला आहे.
देशात यापूर्वी झालेल्या सायबर हल्ल्याच्या वेळी ओनाक्राय या व्हायरसने धुमाकूळ घातला होता. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विंगने या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय करावे, याविषयीचे माहितीपत्रक तयार केले होते.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कंपन्यांनाही याविषयी माहिती देण्यात आली होती. ओनाक्रायचा धोका संपलेला नसताना आता पेंट्याने धुमाकूळ घातला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने राज्याच्या सायबर विंगकडे याविषयी काय खबरदारी घेण्यात यावी? याविषयी विचारणा केली आहे.
भविष्यात सायबर हल्ले होण्याची शक्यता गृहीत धरून शहरातील सर्वच उद्योग समूह, वित्तीय संस्था व आयटीचा वापर असणाऱ्या सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. वैयक्तिक व कार्यालयातील संगणक हाताळतानाही योग्य खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हॅकर मागतात खंडणी
अनोळखी मेल किंवा लिंक उघडल्यामुळे व्हायरस संगणक व लॅपटॉपमध्ये प्रवेश करतो व काही क्षणात कंपनीमधील सर्व संगणक यंत्रणा ठप्प होते. सर्व संगणकीय यंत्रणाच ठप्प होऊन जाते. एखाद्या कंपनीमध्ये सायबर हल्ला केल्यानंतर संगणक व लॅपटॉप सुरू करताना एक मॅसेज दिसू लागतो. तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक केला असून, तुम्हाला तुमचा डाटा हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या पेमेंट आॅप्शनला क्लिक करून ठरावीक रक्कम नमूद केलेल्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली जाते. जेएनपीटीमधील जीटीआयची संगणकप्रणाली हॅक केल्यानंतर प्रत्येक संगणकामधील व्हायरस दूर करण्यासाठी प्रत्येकी ३०० डॉलरची खंडणी मागण्यात आली आहे.

Web Title: Smart City on cyber attack radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.