स्मार्ट सिटीचा निधी जातोय वाया
By admin | Published: July 11, 2017 01:22 AM2017-07-11T01:22:32+5:302017-07-11T01:22:32+5:30
स्मार्ट सिटी या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचा सध्या चुराडा होत असल्याचे दिसत आहे.
अभिजीत डुंगरवाल।
लोकमत न्यूज नेटवर्क
बिबवेवाडी : स्मार्ट सिटी या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचा सध्या चुराडा होत असल्याचे दिसत आहे. अनेक योजना प्रस्तावित आहेत, मात्र आलेला निधी गरज नसलेल्या कामासाठी वापरून अक्षरश: संपवायचे प्रकार होत आहेत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
पुणे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. पुण्याचे आठ आमदार व खासदार देखील भाजपचेच आहेत. केंद्र सरकारने सुरु केलेल्या स्मार्ट सिटी उपक्रमात पुणे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र दक्षिण पुण्यातील चाललेल्या कामाचा कारभार पाहता स्मार्ट पुण्याच्या दिशेने ही कामे होत नाहीत हेच दिसून येत आहे. दक्षिण पुण्यातील तीनही मुख्य रस्ते रुंदीकरण करण्यासाठी काही ठिकाणी काम सुरू आहे, तर काही ठिकाणी निधी आल्यावर कामे सुरु होणार आहेत. मात्र ही कामे करण्याआधी कुठलेही नियोजन झाल्याचे दिसत नाही. सध्या स्वारगेट ते कात्रज मुख्य रस्ता म्हणजेच पुणे-सातारा रोडचे काम सुरु आहे. बीआरटीच्या दुरुस्तीच्या नावाखाली सुमारे ७५ कोटींचा निधी खर्च करण्याचे काम या ठिकाणी सुरु आहे. सत्ताधारी भाजपाने बीआरटीचा निषेध करत हा मृत्यूचा सापळा असल्याचे जाहीर करत अनेक वेळा आंदोलने केली. मात्र हे ठेकेदाराची घरे भरण्याचे सुरु असलेले काम थांबण्याची धमक सत्ताधाऱ्यांत दिसत नाही.
सायकल ट्रॅकच्या नावाखाली रस्ता अरुंद केला जात आहे. आधीच या रस्त्यावर सतत वाहतूककोंडी झालेली असते. दिवसभरात पाहणी केली तर दहादेखील सायकली या ट्रॅकवरून जाताना पाहायला मिळत नाहीत.
अनेक ठिकाणी अतिक्रमण करून येथील करोडो रुपये करून केलेले फुटपाथ गायब झालेले आहेत, याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, आदिनाथ चौपाटी, स्वारगेट बसस्थानक, डीमार्टशेजारील हॉटेल ही मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली जात नाहीत. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार घडत असल्याने अतिक्रमण विभाग या ठिकाणी कारवाई करीत नाही. नियोजनाचा मोठा अभाव येथे दिसून येतो.
दक्षिण पुण्यातील दुसरा मुख्य रस्ता म्हणजे पुष्पमंगल चौक ते व्ही. आय. टी. होस्टेल चौकापर्यंतचा रस्ता. या रस्त्याने तर किती कोटी रुपये आतापर्यंत विविध कामांच्या नावाखाली लाटले असतील याचा हिशोब लावणेदेखील कठीण आहे. या भागातील प्रत्येक नेत्याला वाटेल तसे या रस्त्यावर कामे करून घेतली गेलेली आहेत. त्यामुळे अनेक वेळा हा रस्ता बनवला जातो आणि तोडला जातो. पहिल्या केलेल्या कामाची मुदत संपण्याआधीच दुसऱ्या कामाच्या नावाखाली रस्ता खोदल्यामुळे संबंधित ठेकेदार यांच्यावर मेंटेनन्सची जबाबदारी राहत नाही. या भागात नियोजनाचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी सतत खड्डे पडलेला, पाणी साचलेला रस्ता म्हणून हा रस्ता ओळखला जातो.
दरवर्षी पावसाळी लाईन टाकणे, मोठ्या व्यासाची लाइन टाकणे, ड्रेनेजलाईन टाकणे, पाण्याचे कनेक्शन अशा एक ना अनेक कारणांसाठी हा रस्ता खोदला जातो.
महापालिका हतबल?
दक्षिण पुण्यातील तिसरा महत्त्वाचा रस्ता म्हणजे गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिरपर्यंतचा रस्ता. फक्त अतिक्रमण विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे हा रस्त्याला ग्रहण लागले आहे. या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यापाऱ्यांनी केलेली अतिक्रमणे काढण्यास पुणे महानगरपालिका हतबल दिसत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी व अपघातापासून हा रस्ता कधी मुक्त होणार, याचे उत्तर कोणाकडेच नाही. हा रस्ता जर मोठा झाला तर दक्षिण पुण्यातील बरीचशी वाहतूककोंडी कमी होऊ शकते. मात्र राजकीय दबाव व आर्थिक गणिते हा रस्ता अतिक्रमणमुक्त होऊ देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या भागात झालेली प्रचंड अतिक्रमणे यामुळेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. या ठिकाणी काही दिवसांनी रस्त्याचे काम पुन्हा एकदा सुरु होणार आहे, यासाठी कोट्यवधीचा निधीदेखील मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र आधी या रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे, मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाइन, पावसाळी पाण्याच्या लाइन अजून काही रस्ता खोदण्यासाठी असलेली कामे करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच कोट्यवधी रुपये खर्च करून या ठिकाणी नवीन रस्ता करणे सर्व कर भरणाऱ्या नागरिकांना अपेक्षित आहे.