स्मार्ट सिटी शुभारंभाचा घाईगडबडीने घाट
By Admin | Published: June 22, 2016 01:17 AM2016-06-22T01:17:00+5:302016-06-22T01:17:00+5:30
बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडासंकुल येथे येत्या २५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मार्ट सिटीच्या १४ प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत
पुणे : बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडासंकुल येथे येत्या २५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मार्ट सिटीच्या १४ प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. मात्र, त्यांपैकी ४ प्रकल्प हे महापालिकेच्या निधीतून उभारण्यात येत असून, त्यांचाही स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या यादीत समावेश करण्यात आला असल्याचे उजेडात आले आहे. अनेक स्मार्ट सिटी प्रकल्प अजून पूर्णत्वास जाण्यापूर्वीच त्यांच्या उद्घाटना बार उडवून देण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जातोय.
स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेला येत्या २५ जून रोजी वर्षपूर्ती होत असल्यानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा शुभारंभ करायचा असल्याचे पत्र केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून पालिकेला ८ दिवसांपूर्वी पाठविण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेतील अनेक प्रकल्प अजून पाईपलाईनमध्येच असताना पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन करण्याचे निर्देश नगरविकास मंत्रालयाकडून आल्याने प्रशासनाची मोठी धांदल उडाली आहे.
पंतप्रधानांच्या मोठा गाजावाजा करून होत असलेल्या कार्यक्रमाची तयारी एकीकडे सुरू असताना, दुसरीकडे उद्घाटन करायच्या प्रकल्पांच्या पूर्णत्वाचीही धांदल उडाली आहे. स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांचे घाईगडबडीने उद्घाटन उरकण्यात येत असल्याने प्रत्यक्षात ते सुरू होण्यास आणखी मोठा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत १४ योजनांचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते केला जाणार आहे. मात्र, प्रत्यक्षात पीएमपी मोबिलिटी कार्ड, कचऱ्याच्या गाड्यांना जीपीएस बसविणे, पीएमपी बसना जीपीएस बसविणे आदी कामांसाठी महापालिकेकडून निधी दिला जाणार आहे. मात्र, स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्प असल्याचे सांगून त्यांचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातून पुण्यासह सोलापूर शहराचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.
उद्घाटनावर होणार तब्बल साडेतीन कोटींचा खर्च
पुणे : शहरात होत असलेल्या बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्प शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ३ कोटी ४३ लाख रुपयांचा खर्च होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या खर्चाला पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली. अवघ्या ४ तासांच्या कार्यक्रमासाठी पावणेचार कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याने विरोधी पक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असलेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशनच्या संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला महापौर प्रशांत जगताप, कंपनीचे अध्यक्ष नितीन करीर, सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. उद्घाटनाचे काम एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला देण्यात येणार आहे. त्यापोटी त्या कंपनीला १ कोटी ६० लाख रुपये दिले जाणार आहेत. कार्यक्रमाचा गाजावाजा करण्यासाठी जाहिरातबाजी व फ्लेक्सबाजीवर १ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये जाहिरातीसाठी १ कोटी ७३ लाख रुपये, रेडिओसाठी ४ लाख ७९ हजार, होर्डिंगसाठी ५ लाख २० हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी एवढा मोठा खर्च करणे योग्य नसल्याचे मत अरविंद शिंदे यांनी मांडले आहे.