अमावास्येच्या मुहूर्तावर ‘स्मशान सहल’

By admin | Published: February 27, 2017 12:48 AM2017-02-27T00:48:30+5:302017-02-27T00:48:30+5:30

पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी विविध सहलींचे आयोजन केले जाते

'Smashan Sahal' on the occasion of 'Amavasya' | अमावास्येच्या मुहूर्तावर ‘स्मशान सहल’

अमावास्येच्या मुहूर्तावर ‘स्मशान सहल’

Next

प्रशांत ननवरे,

बारामती, दि. 27- पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी विविध सहलींचे आयोजन केले जाते. बारामतीत शनिवारी मध्यरात्री अंनिसतर्फे एका आगळ्यावेगळ्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शनि अमावस्येच्या मुहूर्तावर ‘स्मशान सहल’ काढण्यात आली. भूतबाधा, पिशाच्च आदी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आयोजित ही सहल चर्चेचा विषय ठरली.
भूताचा आवडता दिवस म्हणजे अमावास्या, भूताची आवडती वेळ रात्री १२ तसेच आवडते ठिकाण स्मशानभूमी आहे, असा सर्वत्र समज आहे. लहानपणापासूनच हा समज नकळतपणे आपल्या मनावर बिंबविला आहे. या पार्श्वभूमीवर हा समज दूर करण्यासाठी या आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. काल शनि अमावास्येचा योग साधून महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समिती बारामती शाखेच्या वतीने रात्री १२ वाजता स्मशान सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीचा उद्देश हा भूत, भूतबाधा यांसारख्या भ्रामक कल्पनांतून तयार होणाऱ्या भीतीवर अथवा न्यूनगंडावरती मात करणे हा आहे. यामध्ये लहान मुले, युवक, युवती व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.
यावेळी श्रमदानातून स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करून त्याठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. अंत्ययात्रेसाठी वापरलेली तिरडी, मोडलेले सूप, उतारा, लिंबू या सहित्यांपासून सर्वजण दूर राहणेच पसंत करतात. या सहित्याविषयी आजही मोठी भीती मनात बाळगली जाते. त्यामुळे आसपास अस्ताव्यस्त पडलेले हेच सहित्य उचलून स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर स्मशानभूमीमध्येच गाणी, गप्पा गोष्टींसह कालची रात्र चांगलीच रंगल्याचे चित्र होते. यावेळी अंनिसचे कार्याध्यक्ष विपुल पाटील म्हणाले, भूत, पिशाच्य, करणी, भानामती याबाबत लहानपणापासून नकळत भीती दाखविणारेच संस्कार केले जातात. त्यातून स्मशानभूमीसह संबंधित सर्वच बाबींकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक बनतो. या पार्श्वभूमीवर निकोप वातावरणनिर्मिती होऊन मनातील गैरसमज दूर व्हावेत. लहान मुलांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. काळ्या बाहुलीची माहिती नसलेल्या मुली त्या बाहुल्यांबरोबर खेळण्यात दंग झाल्या होत्या. यावेळी भारत विठ्ठलदास यांनी ‘चमत्कारातून विज्ञान’ हे प्रयोग दाखवले. यावेळी भापकर, किरण खरात उपस्थित होते.
>पुरणपोळी, आॅम्लेटचा बेत
स्मशान सहलीत परिसराची स्वच्छता, गप्पागोष्टी झाल्यानंतर सर्वांनी घरून आणलेल्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. पुरणपोळी, आॅम्लेट, वडापाव, भाजी-भाकरी आदी पदार्थांचा यामध्ये समावेश होता. या वेळी खाद्यपदार्थांवर ताव मारताना सर्वजण आपण स्मशानभूमीत असल्याचे विसरून गेले होते.

Web Title: 'Smashan Sahal' on the occasion of 'Amavasya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.