भंगारामुळेच धुमसतेय आग
By admin | Published: April 27, 2016 02:34 AM2016-04-27T02:34:57+5:302016-04-27T02:34:57+5:30
देवनार आगप्रकरणी अटकसत्र सुरू असताना, या संदर्भातील अहवाल मात्र लांबणीवर पडला आहे.
मुंबई : देवनार आगप्रकरणी अटकसत्र सुरू असताना, या संदर्भातील अहवाल मात्र लांबणीवर पडला आहे. अंतिम टप्प्यात असलेला अहवाल अचानक मागे पडला आहे. प्राथमिक तपासात देवनारच्या कचराभूमीत जाळल्या जाणाऱ्या भंगारामुळेच आग धुमसत असल्याचा अंदाज वरिष्ठांकडून वर्तविण्यात येत आहे.
देवनार डम्पिंग ग्राउंडला २९ जानेवारी आणि २० मार्च रोजी लागलेल्या आगीप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे डम्पिंग ग्राउंड ११८ हेक्टरमध्ये पसरलेले आहे. ग्राउंडलगत अनेक भंगारविक्रेते आहेत. या भंगाराच्या व्यवसायात अब्जावधींची उलाढाल होते. हे व्यावसायिक येथून जमा झालेले भंगार धनाढ्यांकडे विकतात. डम्पिंग ग्राउंडच्या भिंतींना ठिकठिकाणी भगदाड पाडण्यात आले आहे.
येथून जमा केलेल्या वायर्स, घड्याळे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू भंगार विक्रेते स्वीकारत नाहीत. या वस्तू वितळवून मिळणारा धातू घेतात. कचऱ्याच्या ढिगाला लावलेली आग विझल्यानंतर त्यातील धातू गोळा करण्यासाठी हा खटाटोप असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आत्तापर्यंत १५ जणांना अटक झाली आहे, तर १४ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात फॉरेन्सिक अहवालातही देवनारची आग अपघात असल्याचे नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी आग नेमकी कशामुळे लागली? डिझेल, पेट्रोल, रॉकेल किंवा ज्वलनशील पदार्थामुळे आग भडकली का? असे प्रश्न पोलिसांकडून फॉरेन्सिकला विचारण्यात आले होते. फोरेन्सिक अहवालानुसार, ही आग कुठल्याही ज्वलनशील पदार्थामुळे भडकली नसून, ती अपघाती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
>२९ जानेवारीच्या आगीमागचे गूढ उकलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांच्या आदेशाने पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या नेतृत्वाखाली हा अहवाल बनवण्यात येत आहे. मागील आठवड्यात सादर होणाऱ्या अहवालास आणखी वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबतचा आणखी सखोल तपास सुरू असल्याने आणखी काही कालावधी लागणार असल्याचे लोहिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अहवाल आयुक्तांकडे सादर होताच, यामागचे सत्य समोर येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.