चाळीतील कांद्याला येऊ लागला वास
By admin | Published: September 25, 2016 06:26 PM2016-09-25T18:26:42+5:302016-09-25T18:26:42+5:30
कांद्याला यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कांदा गेल्या अनेक दिवसांपासून चाळीत साठवणूक करून ठेवला
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 25 - कांद्याला यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कांदा गेल्या अनेक दिवसांपासून चाळीत साठवणूक करून ठेवला आहे. मात्र, आता चाळीतील कांद्याला वास येऊ लागला आहे. पिंपळनेर शहरानजीकच्या ग्रामीण भागात तर तर साठवणूक केलेला कांदा सडला असून त्यातून पाणी बाहेर निघत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शिल्लक असलेला कांदा मिळेल, त्या किंमतीत विकण्याची वेळ आली आहे.
साक्री तालुक्याचे मुख्य पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. पण यंदा कांद्याने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा केला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादित केलेला कांदा चाळीत सडत आहे. तर जो काही शिल्लक राहिलेला कांदा आहे. त्या कांद्याला शेतकऱ्यांना फक्त १०० ते २०० रुपये क्विंटलप्रमाणे विकावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. साक्री तालुक्यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. सध्या कांद्याचा भाव पाहिला, तर शेतकऱ्यांची जणू चेष्टाच करण्याचा प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने शेती करूनदेखील त्यांच्या कांद्याच्या उत्पादनाला भाव मिळत नसल्याने शेती करावी तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
सडलेला कांदा फेकावा लागतोय
कांद्याला यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून भाव नाही. त्यामुळे पुढे चांगला भाव मिळेल? या आशेने शेतकऱ्यांनी तब्बल पाच ते सहा महिन्यांपासून कांदा चाळीत साठवणूक करून ठेवला होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून कांदा साठवणूक करून ठेवल्यामुळे कांदा सडत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या चाळीत साठवणूक करून ठेवलेल्या कांद्यातून आता पाणी बाहेर पडत असून त्यातून वासही येत आहे.
१ ते २ रुपये किलोप्रमाणे विक्री
खराब कांदा चाळीत साठवून ठेवण्यापेक्षा मिळेल, त्या किंमतीत शेतकऱ्यांनी विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपळनेरशहरासह लगतच्या ग्रामीण भागात कांदा चक्क १ ते २ रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. तर साक्री व धुळे शहरात कांदा ५ ते १० रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे.
>सरकारने शेतकऱ्यांकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात कांदा सडत चालल्यामुळे येईल, त्या किंमतीत कांद्याची विक्री आम्हांला करावी लागत आहे.
- मयूर घरटे, सामोडे, शेतकरी
>सरकारने कांदा निर्यात केली असती, तर शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला असता. पण व्यापाऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने लक्ष दिले नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- शशिकांत भदाणे, माजी अध्यक्ष, शेतकरी संघटना