धुमस!

By admin | Published: October 11, 2016 04:23 AM2016-10-11T04:23:30+5:302016-10-11T04:24:04+5:30

कायदे कठोर केले की समाजात त्यांचा धाक निर्माण होतो आणि त्यांचा भंग करण्याच्या प्रवृत्ती नामोहरम होतात हे केवळ एक मिथक

Smile! | धुमस!

धुमस!

Next

कायदे कठोर केले की समाजात त्यांचा धाक निर्माण होतो आणि त्यांचा भंग करण्याच्या प्रवृत्ती नामोहरम होतात हे केवळ एक मिथक ठरु पाहाते आहे काय अशी शंका आता येऊ लागली आहे. महिलांवरील अत्त्याचारांच्या संदर्भातील कायदे अधिक कठोर केल्यानंतर तशा घृणास्पद प्रकारांना आळा बसण्याऐवजी उलट ते आणखीनच वाढत चाललेले दिसावेत हे दुर्दैवी असले तरी वास्तव आहे. नाशिकनजीक तळेगाव-अंजनेरी या लहानशा गावात शनिवारी रात्री जो काही किळसवाणा आणि लाजीरवाणा प्रकार घडला तो याचाच द्योतक आहे. पाच वर्षाचे वय ते काय आणि पंधरा वर्षाचे वय तरी असे कितीसे समजदारीचे. पण पाच वर्षाच्या अजाण आणि निष्पाप बालिकेवर एका पंधरा वर्षीय मुलाने बलात्कार केला म्हटल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया केवळ त्या गावात किंवा परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात न उमटती तरच आश्चर्य होते. नगर जिल्ह्यातील कोपर्डीत आणि त्याच जिल्ह्यातील पाथर्डीत असेच प्रकार घडले व कायद्याच्या लेखी हे प्रकार त्यांच्या तार्किक शेवटापर्यंत जाण्याआधीच तळेगावचा प्रकार घडला. लोक संतप्त झाले आणि संतप्त जमावाचे मानसशास्त्रच वेगळे असल्याने या समाजाने जो समोर येईल त्याच्यावर आपला संताप काढण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत सरकारने म्हणजेच सरकारच्या प्रतिनिधीने समक्ष हजर राहून लोकांच्या क्षुब्ध भावनांना आवर घालणे आणि दु:खित आणि पीडितांना दिलासा देणे त्याचे कर्तव्यच ठरते. पण तळेगावला याबाबतीत अंमळ वेगळाच अनुभव आला आणि लोक अधिकच प्रक्षुब्ध झाले. घडलेल्या घटनेचा साधकबाधक विचार केला जाण्याची आणि समजूत व सबुरीने घेण्याची अपेक्षा अशा स्थितीत जमावाकडून बाळगता येत नाही. अर्थात त्याचे भान शासनकर्त्यांनी बाळगायचे असते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपले कर्तव्य बजावताना लोकाना शांततेचे आवाहन केले आणि पंधरा दिवसात खटला दाखल करण्याचे जाहीरही केले. अर्थात हेच त्यांनी कोपर्डी प्रकरणीही जाहीर केलेच होेते. वस्तुत: जर त्या अभागी बालिकेची वैद्यकीय तपासणी शनिवारी रात्रीच झाली होती आणि संबंधित मुलग्यास पोलिसांनी लगेच अटकही केली होती तर मग खटला दाखल करण्यास पंधरा दिवस तरी लागण्याचे काही कारण नाही. एकदा आरोपपत्र दाखल केले व अधिक तपासांती आणखी काही बाबी उघड झाल्या तर पुरवणी आरोपपत्रदेखील दाखल करता येतच असते. परिणामी सत्वर कारवाई केली जाण्याने प्रक्षुब्ध समाजाच्या भावना निवळण्यास थोडी फार तरी मदत नक्कीच होऊ शकते. तळेगाव प्रकरणात तसे होण्याची अधिक गरज आहे व त्याचीही काही कारणे आहेत. शनिवार रात्रीपासून नाशिक-त्र्यंबेकश्वर रस्त्यावरील तळेगाव परिसरात जो तणाव निर्माण झाला तो हळूहळू सरकत गेला आणि रविवारी या तणावाने संपूर्ण नाशिक जिल्ह्याला घेरले. सोमवारचा दिवसदेखील तणावातच सुरु झाला आणि या तणावातच कोणत्या क्षणी काय होईल याचा भरवसा नाही अशी स्फोटक भीती भरली गेली. याचा एक अर्थ असाही निघू शकतो की हा जो काही उद्रेक दिसतो आहे तो केवळ तळेगावच्या घटनेतूनच निर्माण झालेला नसावा. कारण ती घटना घडल्यापासून समाज माध्यमांमधून ज्या संदेशांचे मोठ्या प्रमाणावर आदान-प्रदान सुरु झाले ते समाजाच्या विभिन्न घटकांमध्ये तेढ निर्माण होईल अशा स्वरुपाचे होते. या विध्वंसक संदेशांचे हिडीस दृष्य रुपदेखील लोकांच्या अनुभवास आले. त्यामुळे पोलीस आणि सरकार यांनी परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली असल्याचे जाहीर करुन लोकाना आश्वस्त केले असले तरी लोकांच्या मनातील भीती कमी करण्यावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. लोकानी अफवांवर विश्वास ठेऊ नये हे अशा प्रसंगांमधील पालुपदही आता निरर्थक ठरु लागले आहे कारण फेसबुक वा व्हॉट्स अ‍ॅपवरुन जे संदेश दिले घेतले जातात ते इतके ‘आत्मविश्वासपूर्ण’ असतात की त्यांच्या समोर पोलिसांचे आवाहन केविलवाणेच ठरते. याच संदर्भात मग अधूनमधून डोके वर काढणाऱ्या ‘नेट न्यूट्रॅलिटी’च्या विषयाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहाण्याची गरज आहे का असा प्रश्न निर्माण होतो. इंटरनेटच्या जोडणीबरोबर सारी समाज माध्यमे फुकटात उपलब्ध होणे एरवी कितीही उपयोगी वाटत असले तरी व्हॉट्स अ‍ॅपसारखे दुधारी अस्त्र अशा वेळी अत्यंत घातक ठरत असते. कोणतेही अस्त्र एकाचवेळी तारक आणि मारकही असते, प्रश्न केवळ ते कोणाच्या हाती गेले यातून निर्माण होत असतो. तणावाच्या प्रसंगी अशी सारी अस्त्रे मारकच ठरविली जातात आणि तसे नसते तर सोमवारी सकाळपासून पोलिसांनी नाशिकमधील इंटरनेट सेवा बंद करुन ठेवली नसती. याच संदर्भात मग आठवण होते ती सर आॅल्फ्रेड नोबेल यांची. जगातील शांततेचा सर्वोच्च पुरस्कार ज्यांच्या नावे दिला जातो, त्याच या नोबेल यांनी आधी डायनामाईटचा शोध लावला आणि त्यातूनच पुढे जिलेटीनचा अवतार उदयास आला. मानवजातीच्या कल्याणासाठी आपण हे संशोधन केले पण त्याच्या संहारक शक्तीचा दुरुपयोग पाहून नोबेल यांना त्यांच्या उत्तरायुष्यात पश्चात्ताप होऊ लागला. इंटरनेटच्या आणि व्हॉट्स अ‍ॅप आणि तत्सम समाज माध्यमांच्या उद्गात्यांवर उद्या अशीच वेळ न येवो म्हणजे मिळवली.

Web Title: Smile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.