माशांच्या वाहतुकीआडून विदेशी मद्याची तस्करी
By admin | Published: August 7, 2015 01:18 AM2015-08-07T01:18:03+5:302015-08-07T01:18:03+5:30
वातानुकूलित ट्रकमध्ये बर्फमिश्रित माशांनी भरलेल्या क्रेट्समागे लाखो रुपयांचा विदेशी मद्यसाठा लपवून नेणारा वातानुकूलित ट्रक राज्य उत्पादन
नाशिक : वातानुकूलित ट्रकमध्ये बर्फमिश्रित माशांनी भरलेल्या क्रेट्समागे लाखो रुपयांचा विदेशी मद्यसाठा लपवून नेणारा वातानुकूलित ट्रक राज्य उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाने गुरुवारी पहाटे सापळा रचून पकडला. द्वारकानजीक केलेल्या या कारवाईत हा ट्रक तसेच दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मध्य प्रदेशातून नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने हा ट्रक पहाटेच्या सुमारास येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. केवळ मध्य प्रदेशमध्येच विक्रीची परवानगी असलेल्या एका विदेशी ब्रॅण्डच्या मद्याच्या बाटल्यांचे एक हजार दोनशे खोके या ट्रकमधून लपवून नेले जात होते. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पहाटे साडेचारच्या सुमारास द्वारकानजीक सापळा रचून हा ट्रक पकडला.
या प्रकरणी ट्रकचालक शमीरबाबू अखमद कुटी आणि वाहक शाहीद हमजा या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रकची तपासणी केली असता प्रथमदर्शनी त्यात मासे आढळले; मात्र कर्मचाऱ्यांनी क्रेट खाली काढल्यानंतर मद्याच्या बाटल्यांनी भरलेले खोके आढळल्याची माहिती दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी दिली.