सापाचा मध्यरात्री थरार! सहा वर्षांच्या मुलीच्या गळ्यात दोन तास विळखा घालून बसला; अखेर डसला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 11:58 AM2021-09-11T11:58:17+5:302021-09-11T11:59:40+5:30
Snake bite girl: मदतीला अनेकांनी धाव घेतली परंतु कोणताही उपाय चालला नाही. तर बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे त्या सापास धोका वाटल्याने तो सुद्धा जागा सोडण्यास तयार नव्हता.
वर्धा : झोपेत असलेल्या मुलीच्या अंगावर सलग दोन तास ठिय्या मांडून असलेल्या विषारी सापाने शेवटी त्या मुलीच्या हाताला चावा घेतला आणि दिसेनासा झाला. सदर मुलीस सेवाग्रामच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
अंगावर काटा आणणारी ही घटना तालुक्याच्या बोरखेडी(कला) येथे घडली. पूर्वा पद्माकर गडकरी (६) ही तिच्या आई सोबत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जमिनीवर अंथरून टाकून झोपली होती.रात्री १२ च्या सुमारास हा विषारी साप दोघी मायलेकींच्या अंगावर चढला, यात आईला जाग आल्यामुळे ती बाजूला झाली परंतु तो साप मुलीच्या गळ्याला विळखा घालून फणा काढून असल्यामुळे तिला स्तब्ध राहण्यास सांगितले.
मदतीला अनेकांनी धाव घेतली परंतु कोणताही उपाय चालला नाही. तर बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे त्या सापास धोका वाटल्याने तो सुद्धा जागा सोडण्यास तयार नव्हता. हा थरार तब्बल दोन तास चालला. हा प्रकार बघून उपस्थितांच्या अंगावर काटे आले तर त्या मुलीची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. शेवटी रात्री २ च्या सुमारास त्या सापाने मुलीच्या गळ्यातून विळखा सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु सापाचा काही भाग मुलीच्या पाठीखाली दबून असल्याने त्या अतिशय विषारी सापाने त्या मुलीच्या हाताला चावा घेतला आणि दिसेनासा झाला. उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी त्या मुलीस तातडीने सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात भरती केले. सध्या ती मुलगी सेवाग्राम येथे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.