एसएनडीटी विद्यापीठामध्ये आता ‘ड्रेसकोड’
By admin | Published: January 18, 2017 06:30 AM2017-01-18T06:30:31+5:302017-01-18T06:30:31+5:30
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने (एसएनडीटी) चर्चगेट कॅम्पसमध्ये ड्रेसकोडचे नवीन फर्मान काढले आहे
मुंबई : मुलींच्या अभ्यासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने (एसएनडीटी) चर्चगेट कॅम्पसमध्ये ड्रेसकोडचे नवीन फर्मान काढले आहे. विद्यापीठात शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींनी ‘फॉर्मल ड्रेस’ घालण्याची सक्ती केली आहे.
विद्यार्थिनी अनेकदा आखूड कपडे घालून येतात. याची दखल विद्यापीठाने घेतली असून, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व विभाग प्रमुखांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ड्रेसकोडचा निर्णय हा एकतर्फी घेण्यात आलेला नाही.
विद्यार्थिनींच्या पालकांचे मतही याबाबत जाणून घेतले आहे. विद्यार्थिनी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येतात, याचे भान त्यांना असणे आवश्यक आहे. विद्यार्थिनींकडून कोणत्याही प्रकारे नाराजी नाही. आमचा हेतू स्पष्ट असल्याचे मत विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)