...तर १४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’चा १३ वा हप्ता, हे एक काम करणे अनिवार्य
By नितीन चौधरी | Published: February 5, 2023 01:40 PM2023-02-05T13:40:29+5:302023-02-05T13:40:37+5:30
दरम्यान, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या आणि निधीचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे बाराशे कोटींची वसुली सुरू करण्यात आली आहे.
पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दिला जाणारा दोन हजारांचा १३वा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. बँक खात्याला आधार न जोडलेल्या सुमारे १४ लाख शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोस्ट, बँकेची मदत घेऊन १० फेब्रुवारीपर्यंत आधार जोडणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
दरम्यान, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या आणि निधीचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे बाराशे कोटींची वसुली सुरू करण्यात आली आहे. त्यात ९० कोटी वसूल करण्यात आले असून, अद्याप अकराशे कोटींची थकबाकी आहे.
- २० लाखांहून अधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यांच्याकडून अद्यापही १ हजार ९१ कोटींची थकबाकी
- १,०१,००० शेतकऱ्यांकडून ९० कोटी ३३ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.
पैसे डिसेंबरमध्ये -
शेतकऱ्यांकडून ई-केवायसीसाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. या योजनेचा बारावा हप्ता ऑक्टोबरमध्ये देण्यात आला, तर १३वा हप्ता डिसेंबरमध्ये देण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्र सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्याची अट घातली, तसेच प्राप्तिकर भरणारे, अधिकारी व कर्मचारी असणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.