....म्हणून संतप्त नागरिकांनी लाईनमनचे अपहरण करुन बांधले
By Admin | Published: August 21, 2016 12:08 PM2016-08-21T12:08:23+5:302016-08-21T12:08:23+5:30
समांतर जलवाहिनी कंपनीच्या दोन लाईनमनचे अपहरण करून चक्क वसाहतीत एक तास बांधून ठेवले. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २१ : न्यू नंदनवन कॉलनी परिसरातील भूजबळनगर व परिसरातील वसाहतींना गुरूवारी पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागातील एका नगरसेविकेच्या पी.ए.ने समांतर जलवाहिनी कंपनीच्या दोन लाईनमनचे अपहरण करून चक्क वसाहतीत एक तास बांधून ठेवले. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भूजबळनगर आणि परिसरातील वसाहतींना ज्युबलीपार्क येथील पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा होतो. गुरूवारी पाणीपुरवठ्याचा दिवस होता. मात्र वसाहतींना पाणी मिळाले नाही. फारोळा येथून अत्यंत कमी दाबाने ज्युब्लीपार्कला पाणी आले. टाकीची लेव्हलपण कमी होती. त्यामुळे भूजबळनगरला पाणीपुरवठा होवू शकला नाही.
शनिवारी परत पाण्याचा दिवस होता. ज्यावेळी पाणी यायला हवे होते त्यावेळी आले नाही. त्यामुळे या वॉर्डातील नगरसेविकेच्या स्वीय साह्यकाने दुपारी २ वाजता थेट ज्युब्लिपार्क पाण्याची टाकी गाठली. टाकीवर शेख वसीम आणि सचिन वाणी हे दोन लाईनम सापडले. दोघांना स्वीय साह्याने पकडून नेले. थेट भूजबळनगर येथे नेवून एका विजेच्या खांबाला दोघांना बांधून टाकले. दोघांना बेदम मारहाण करण्याचा दमही भरण्यात आला. एक तास दोन्ही लाईनमनला बांधून ठेवले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
सायंकाळी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी स्वामी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघा लाईनमची साधी विचारपूसही केली नाही. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारी पाणीपुरवठा न झाल्याने भूजबळनगर भागातील नागरिकांनी व नगरसेविकेने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला होता. कंपनीचा एकही अधिकारी उपलब्ध न झाल्याने राग अनावर झाला होता. मागील दोन महिन्यांपासून शहरतील अनेक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरसेवकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला तर एकही अधिकारी फोन उचलत नाही.