Video ...म्हणून राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला; धनंजय महाडिकांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 05:51 PM2019-09-01T17:51:12+5:302019-09-01T19:25:47+5:30
संपूर्ण देश नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या कामावर प्रभावित आहे.
सोलापूर - गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपा-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज सोलापुरात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी खासदार धनंजय महाडीक, आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे भाजपात प्रवेश करणार आहे.
तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना धनंजय महाडीक यांनी राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे हा निर्णय घेत असल्याचं बोलून दाखविले. धनंजय महाडीक यांनी सांगितले की, मी 5 वर्ष लोकसभेच्या माध्यमातून काम केलं. संसदरत्न खासदार म्हणूनही माझा गौरव करण्यात आला. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी प्रयत्न करून सुद्धा स्वकीयांकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली.
तसेच संपूर्ण देश नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या कामावर प्रभावित आहे. आम्हीदेखील त्यांच्या कामावर प्रभावित झालो आहोत. मतदारसंघाचा विकास, कामे करून घेण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे मात्र राष्ट्रवादी सोडत असलो तरी शरद पवार, सुप्रियाताई आणि अजितदादांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. माझा कोणाशी वाद नाही असंही धनंजय महाडीक यांनी सांगितले.
धनंजय महाडीक हे 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार झाले, पण त्यानंतर त्यांनी भाजपशी जास्त जवळीक केल्याने त्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी कोल्हापुरातून टोकाचा विरोध झाला. खुद्द शरद पवार यांच्या समोर झालेल्या बैठकीत दोन वेळा त्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली होती, त्यांच्या तक्रारींचा अहवालही वरिष्ठांकडे पाठवला गेला होता, पण पक्षाचे नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी महाडीक यांचे असलेले कौटुंबिक व निकटचे संबंध यामुळे या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले. उलट राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्याची समजूत काढण्यात आली आणि अखेर त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र तरीही पक्षाच्या एका कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. भाषण सुरू असताना त्यांनी भाषण थांबवावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यावेळी हसन मुश्रीफ यांनी माईकचा ताबा कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं.