तो मृतदेह शीनाचाच..!

By admin | Published: September 5, 2015 01:56 AM2015-09-05T01:56:10+5:302015-09-05T01:56:10+5:30

पेणच्या गागोदे गावातून मुंबई पोलिसांनी हस्तगत केलेली मानवी कवटी व हाडे शीना बोराचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

So do the dead bodies ..! | तो मृतदेह शीनाचाच..!

तो मृतदेह शीनाचाच..!

Next

मुंबई : पेणच्या गागोदे गावातून मुंबई पोलिसांनी हस्तगत केलेली मानवी कवटी व हाडे शीना बोराचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘डीजिटल फेशिअल सुपर इम्पोझिशन’ चाचणीसाठी नायर रूग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी उभा केलेला चेहरा शीनाच्या छायाचित्राशी जुळला आहे. मुंबई पोलिसांनी या हायप्रोफाईल हत्याकांडाची उकल करून आरोपी गजाआड केले असले तरी थेट पुरावे नसल्याने हे प्रकरण न्यायालयात टिकेल का हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र डिजिटल इम्पोझिशन चाचणीचा अहवाल हा या हत्याकांडात गजाआड झालेल्या इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना व ड्रायव्हर श्याम राय यांच्याविरोधातील भक्कम पुरावा मानला जात आहे.
तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार या चाचणीतून मृतदेह २२ ते २५ वयोगटातील, १५३ ते १६० सेंटीमिटर उंचीच्या तरूणीचा आहे. तसेच मृतदेहाची विल्हेवाट २ ते ५ वर्षांच्या कालावधीत लावण्यात आली आहे, अशी अन्य निरीक्षणे समोर आली आहेत.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार शीनाची हत्या वांद्रयाच्या नॅशनल महाविद्यालयाजवळील निर्जन रस्त्यावर गळा आवळून करण्यात आली. या हत्येत इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम राय यानेही प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्याने शीनाचे पाय पकडले तर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याने शीनाचा गळा आवळला होता. शीनाची हत्या २४ एप्रिल २०१२ रोजी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी इंद्राणी, संजीव व राय यांनी शीनाचा मृतदेह गादोदे गावात नेला, जाळला. पेण पोलिसांना हा अर्धवट जळालेला मृतदेह मे महिन्यात सापडला. पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष जेजे रूग्णालयात अ‍ॅनाटॉमी चाचणीसाठी धाडले. त्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह गागोदे गावातील स्मशानभुमीत पुरला.तीन वर्षांनी जेव्हा हे हत्याकांड उघडकीस आले तेव्हा खार पोलिसांनी पुरलेला मृतदेह पुन्हा उकरला. त्या ठिकाणाहून मानवी कवटी, चेहऱ्याची हाडे आणि अन्य अवशेष सापडले होते. या अवशेषांची डीएनए चाचणी करण्याआधी पोलिसांनी डिजिटल फेशिअल सुपर इम्पोझिशन चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता.

श्यामने पकडले पाय, खन्नाने आवळला गळा
पेणला नेण्याआधी मृतदेहाचा केला नट्टापट्टा
हत्या केल्यानंतर शीनाचा मृतदेह आरोपी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना, ड्रायव्हर श्याम राय यांनी एका सुटकेसमध्ये भरला. दुसऱ्या दिवशी पहाटे हा मृतदेह पुन्हा सुटकेसमधून बाहेर काढून पेणला नेला. मात्र त्याआधी इंद्राणीने शीनाच्या मृतदेहाचे केस विंचरले. लिपस्टिक आणि पावडर लावून मृतदेहाचा नट्टापट्टा केला. गाडीत पाठच्या सीटवर मृतदेह मध्ये ठेवून इंद्राणी व संजीव आजूबाजूला बसले आणि पेणच्या गागोदे खिंडीत धडकले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणीने शीनाला फोन करून वांद्र्याच्या नॅशनल महाविद्यालयाजवळ बोलावले होते. व्यवसायाशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची असल्याची थाप तिने मारली होती. दरम्यान, शीना तिथे आली. गाडीत बसताच ड्रायव्हर श्याम रायने तिचे पाय पकडले तर आधीपासून गाडीत बसलेल्या संजीवने गळा आवळून शीनाला ठार मारले.

इंद्राणीने शीनाच्या हत्येसाठी वरळीच्या ए. एम. मोटर्सकडून भाड्याने घेतलेली शेव्हरलेट आॅप्ट्रा कार (एमएच ०१ एमए २६०५) खार पोलिसांनी हस्तगत केली आहे. ही कार ए. एम. मोटर्सचे मालक फैजल अहमद यांनी दुसऱ्याला विकली. दुसऱ्याने तिसऱ्याला विकली होती. पोलिसांनी तिसऱ्या मालकाकडून ही कार हस्तगत केली आहे. या कारची फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपासणी केली जाईल, असे समजते. कार विकत घेणाऱ्या तिसऱ्या मालकाचाही जबाब पोलिसांनी नोंदविला आहे.

‘त्या’ मेलचा
आयपी अ‍ॅड्रेस लंडनचा
शीनाच्या हत्येनंतर इंद्राणीने मे २०१२मध्ये एका कर्मचारी महिलेला हॉटमेलवर शीनाच्या नावे बनावट अकाउंट तयार करण्याचे आदेश दिले होते. ज्याचा पासवर्ड इंद्राणीने स्वत:कडे घेतला. तिने या अकाउंटवरून शीनाच्या नावे भाऊ मिखाइल बोरा, पीटर मुखर्जी आणि विधी खन्ना यांना प्रत्येकी दोन मेल पाठवले. त्यात, मी अमेरिकेत पोहोचले. माझी काळजी करू नका, मी इथे खूप खूश आहे, असा निरोप धाडला. २०१४पर्यंत इंद्राणीने या अकाउंटचा वापर करून शीनाच्या नावे तिच्या नातेवाइकांना ईमेल धाडल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. हे ईमेल अकाउंट बहुतांशी लंडनहून हाताळण्यात येत होते, ही अत्यंत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. कारण इंद्राणी व पीटर हे दाम्पत्य लंडनमध्येच वास्तव्यास होते.

Web Title: So do the dead bodies ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.