"औरंगाबादच्या नामांतराचा विषय केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का?", रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 05:26 PM2023-06-13T17:26:57+5:302023-06-13T17:28:02+5:30
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटमध्ये छत्रपती संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद उल्लेख करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : राज्यातील वक्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी एक वेबपोर्टल सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटमध्ये छत्रपती संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद उल्लेख करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचा विसर पडलेला दिसतोय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले, "मुख्यमंत्री महोदय आजच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या फोटोचा जसा आपल्या पक्षाला विसर पडला तसाच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचाही विसर पडलेला दिसतोय... आणि विसर पडला नसेल तर नामांतराचा विषय तुम्ही सुद्धा केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का? विरोधी पक्षाकडून अशी चूक झाली असती तर सरकारकडून त्याचं राजकारण झालं असतं. मला राजकारण करायची नाही, पण आपल्या कार्यालयाकडून झालेली चूक निदर्शनास आणून द्यायचीय.. ती आपण दुरुस्त कराल, ही अपेक्षा!"
मुख्यमंत्री कार्यालयाने सीएमओ महाराष्ट्र अकाउंटवरून ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, "मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते वक्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेबपोर्टलचा आज शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कार्यालय औरंगाबादला असून राज्यातील वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांच्या कामकाजाच्या अनुषंगाने औरंगाबाद येथे जावे लागते. ही अडचण दूर करून वक्फ मालमत्तांशी संबंधित कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या हेतूने https://mahawaqf.maharashtra.gov.in हे वेब पोर्टल विकसित केले आहे. आता ऑनलाईन नोंदणीची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे."
मुख्यमंत्री महोदय आजच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या फोटोचा जसा आपल्या पक्षाला विसर पडला तसाच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचाही विसर पडलेला दिसतोय... आणि विसर पडला नसेल तर नामांतराचा विषय तुम्ही सुद्धा केवळ राजकारणासाठी वापरता, असं… https://t.co/Xbs6NAasS4pic.twitter.com/xXJYI5Bl6L
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 13, 2023
दरम्यान, राज्यातील काही वृत्तपत्रांमध्ये आज छापून आलेल्या शिवसेनेच्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषण होत होती. आता मात्र देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात होत आहे. या जाहिरातीमुळे राज्यात आता चर्चांना उधाण आले आहे. या जाहिरातीवरून सुद्धा रोहित पवार यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. "शिंदे गटाची शिवसेना स्वतःला प्रमोट करत आहे, गेल्या दहा दिवसापासून भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू झाला आहे.तर काही नेत्यांना मंत्रिपदावरून काढावं, असा वाद सुरू झाला आहे.तर शिंदे गट मोठा पक्ष म्हणून प्रस्थापित झाला आहे आणि भाजप महत्वाची नाही असं दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाला भाजपचे नाहीतर भाजपला शिंदे करायची गरज आहे", असे रोहित पवार म्हणाले.