‘मेपल’विरुद्ध आतापर्यंत ४० तक्रारी
By admin | Published: April 22, 2016 01:28 AM2016-04-22T01:28:59+5:302016-04-22T01:30:42+5:30
पुणे शहराच्या जवळ अवघ्या पाच लाखांत घरे देण्याच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या मेपल ग्रुपविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत
पुणे : पुणे शहराच्या जवळ अवघ्या पाच लाखांत घरे देण्याच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या मेपल ग्रुपविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मेपलच्या या योजनेमध्ये आॅनलाईन पद्धतीने १५ हजार तर प्रत्यक्ष ४ हजार ८६० अशा एकूण २० हजार लोकांनी बुकिंग केल्याचे समोर आले आहे. तक्रारदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरूअसून, जवळपास ५०० गुंतवणूकदारांनी
फोन करून संपर्क साधल्याची
माहिती पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.
पोलिसांनी सर्व बँकांना पत्र देऊन मेपलच्या खात्यांची माहिती मागवली आहे. त्यांचे बँक आॅफ महाराष्ट्रचे खाते गोठवण्यात आले असून, अन्य बँकांकडून कंपनीशी संबंधित चालू, बचत अशा सर्वच खात्यांची माहिती मागवण्यात आली आहे. नागरिकांचे बुकिंगचे पैसे परत करण्याचे काम सुरू करण्यात
आले असून, कंपनीचे कर्मचारी पोलिसांना सहकार्य करीत आहेत. मात्र, मालक सचिन अगरवाल
अद्याप पोलिसांसमोर आलेले
नाहीत. एकप्रकारे ते पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करीत नाहीत असेही साकोरे म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, मुद्रांक शुल्क विभाग, महावितरण व अशा अन्य संबंधित विभागांशी पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून मेपलच्या परवानग्यांविषयी माहिती घेण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १२०० गुंतवणूकदारांना कंपनीतर्फे पैसे परत दिल्याचे पोलिसांनी सांगितले. गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक संख्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील लोकांची आहे. अन्य जिल्ह्यांतील लोकांची संख्या कमी असल्याचेही साकोरे यांनी स्पष्ट केले. सचिन अगरवाल यांना चौकशीसाठी
हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र ते चौकशीसाठी हजर राहिलेले
नाहीत. या योजनेसंबंधीची कागदपत्रे जप्त करण्याचे काम सुरू आहे. यासंबंधी आणखीही तक्रारी प्राप्त होत असून, त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)
> ‘मेपल’ने केले १३,५०० गुंतवणूकदारांचे पैसे परत
मेपल शेल्टर्सने ‘आपलं घर’ योजनेद्वारे गुंतवणूक केलेल्यांपैकी १३ हजार ५०० गुंतवणूकदारांना रक्कम परत केली आहे. तर ५०० गुंतवणूकदारांनी पैसे परत घेण्यास नकार देत कंपनीवर विश्वास दाखवला आहे. गुरुवारी कार्यालयाला भेट दिलेल्या ४ हजार अर्जदारांपैकी ३ हजार ५०० अर्जदारांना पैसे परत करण्यात आले आहेत. आॅनलाईन पद्धतीने बुकिंग केलेल्या १० हजार अर्जदारांचे पैसे आॅनलाईन पद्धतीने देण्यात येत असून, त्यांच्या खात्यात येत्या १२ दिवसांत पैसे जमा केले जातील असे मेपलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन अगरवाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे
> कंपनीबाहेर मोठी गर्दी
पाच लाखांत घर देण्याचे आमिष दाखवणाऱ्या मेपल कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या योजनेमध्ये पैसे गुंतवणाऱ्या ग्राहकांनी पैसे परत मिळवण्यासाठी कंपनीबाहेर मोठी गर्दी केली होती. कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर योजनेतून बाहेर पडू इच्छिणाऱ्या ग्राहकांना पैसे परत दिले जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, कंपनीबाहेर सकाळी ९ वाजल्यापासून ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. कंपनीतर्फे कार्यालयामध्ये ८ काऊंटर लावण्यात आले होते. ग्राहकांची पैसे भरल्याची पावती, ओळखपत्र तपासून त्यांना एक अर्ज देण्यात आला. या अर्जावरील माहिती भरून ग्राहकांना त्वरित पैसे दिले जात होते. दिवसभरात हजारो ग्राहकांनी पैसे परत घेण्यासाठी गर्दी केली. काही ग्राहकांनी या योजनेमध्ये कायम राहण्यासाठीही
नावनोंदणी केली,
> फसवणुकीला बळी पडू नका : प्रियदर्शनी निकाळजे
कमी किमतीत पुण्यासारख्या शहरात हक्काचे घर घेण्यासाठी जनघर योजनेत पैसे गुंतविलेल्या गरजू नागरिकांना कायदेशीर पद्धतीने न्याय मिळावा या हेतूने रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या पुणे जिल्हा युवती अध्यक्षा प्रियदर्शनी निकाळजे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.