बारावीच्या विद्यार्थ्यांकडून आतापर्यंत ७,८६४ अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 04:16 AM2019-06-04T04:16:02+5:302019-06-04T04:16:20+5:30
गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक छायांकित प्रतींची मागणी; ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र पाच काउंटर्स
मुंबई : बारावी परीक्षेच्या निकालानंतर गुणपडताळणी, तसेच पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक छायांकित प्रतीसाठीच्या अर्जाच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांकडून आतापर्यंत ७,८६४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विशेषत: विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत. याची दखल घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया जलदगतीने करण्यासंदर्भातील आदेश मंडळाला दिले आहेत. त्यानुसार, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी दिली.
३ जून, २०१९च्या दुपारपर्यंत एकूण ७,८६४ अर्ज मंडळाकडे दाखल झाले असून, यातील १,७७७ अर्ज गुणपडताळणीसाठी तर पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक छायांकित प्रतीसाठी ६,०८७ अर्ज दाखल झाले आहेत. मुंबई विभागीय मंडळ स्तरावर विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र पाच काउंटर्स कार्यान्वित केल्याची माहिती खंडागळे यांनी दिली.
पुनर्मूल्यांकनाचे काम होईपर्यंत सुट्ट्या रद्द
गतवर्षीपेक्षा यंदा पुनर्मूल्यांकनासाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होत आहेत, ही बाब विचारात घेऊन, या कामासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कायम आस्थापनेकडून सुमारे १५ कर्मचारी व रोजंदारीवर ३० कर्मचारी नियुक्त केले आहेत. उत्तरपत्रिका पडताळणीच्या कामासाठी सुमारे ८० शिक्षक नेमले असून, मंडळ आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पुनर्मूल्यांकनाचे काम पूर्ण होईपर्यंत रद्द केल्या आहेत, असे खंडागळे यांनी सांगितले.
काय आहे पुनर्मूल्यांकनाची पद्धत?
ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट दुसºया दिवशी प्राप्त होते व त्याआधारे पेपर पुलिंग स्लिप केस पेपर व अन्य रिपोर्ट तयार करून पुढील कामास सुरुवात होते.
स्ट्राँगरूममध्ये उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यामधून उत्तरपत्रिका काढणे, केस पेपरनुसार प्रकरण तयार करणे, तपासून झालेल्या केसेसची वर्गवारी ‘चेंज नो चेंज’ पद्धतीने करणे, ‘नो चेंज’ प्रकरणांच्या उत्तरपत्रिकांचे होलॉक्राफ्ट स्टिकर काढणे, स्टिकर काढलेल्या उत्तरपत्रिका झेरॉक्स काढण्यासाठी पाठविणे आदी कामे होतात. या कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका देण्यासाठी सुमारे ८ दिवसांचा कालावधी कालावधी लागू शकतो, असे शरद खंडागळे यांनी स्पष्ट केले.
...म्हणूनच घसरला बारावीच्या निकालाचा टक्का
गेल्या वर्षीपर्यंतच्या परीक्षा पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना भरमसाठ गुण दिले जायचे. या गुणांवर ते अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेत प्रवेश घ्यायचे, परंतु ५० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण व्हायचे, अथवा त्यांना केटी लागायची. त्यानंतर अनेकजण शाखा बदलायचे. अनेकांचे विनाकारण वर्ष वाया जायचे. त्यामुळे यंदाच्या परीक्षा पद्धतीचा पॅटर्न बदलण्यात आला.
नव्या पॅटर्ननुससार बहुपर्यायी प्रश्नांचे प्रमाण कमी करून दीर्घोत्तरी प्रश्न वाढविले. प्रश्नपत्रिकेचे मूल्यमापन नवीन पद्धतीने केल्यामुळे, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना यंदा तुलनात्मकदृष्ट्या कमी गुण मिळाले व त्यामुळे बारावीच्या निकालाचा टक्का घसरला असावा, असे खंडागळे म्हणाले.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण आता महाविद्यालयात दर्शनी भागावर
बारावीचा निकाल लागून आठवडा उलटत आला, तरी निकालाचा टक्का घसरण्याला कारणीभूत ठरत असलेल्या अंतर्गत गुणांचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या अंतर्गत गुणांसंदर्भातील तक्रारी मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यालयात सातत्याने दाखल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे अंतर्गत, प्रात्यक्षिक आणि तोंडी गुण महाविद्यालयांच्या दर्शनी भागांत लावण्याच्या सूचना सोमवारी मुंबई विभागीय मंडळाने दिल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यांचे अंतर्गत गुण महाविद्यालयांकडूनच कळण्यास मदत होणार आहे.