आतापर्यंत सरकार झोपले होते का?
By Admin | Published: May 3, 2017 04:18 AM2017-05-03T04:18:57+5:302017-05-03T04:18:57+5:30
तूरखरेदीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा साक्षात्कार मुख्यमंत्र्यांना झाला आहे. तसे असेल तर आतापर्यंत सरकार झोपले होते का
मुंबई : तूरखरेदीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा साक्षात्कार मुख्यमंत्र्यांना झाला आहे. तसे असेल तर आतापर्यंत सरकार झोपले होते का? तूरखरेदीत गैरप्रकार झाला असेल, तर सरकारने दोषींना फासावर चढवावे, पण त्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस का धरता, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
या घोटाळ्यात सरकारी अधिकारी गुंतले असण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यावरून फडणवीस सरकारचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी शिवसेना मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना स्टंटबाजी करत असल्याचा आरोप विखे यांनी केला. शिवसेनेला विशेष अधिवेशन हवे असेल, तर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी लावून धरावी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन निवेदन देण्यात काय अर्थ आहे? कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकला होता, परंतु सेनेची मंडळी पूर्ण वेळ सभागृहातच होती. कर्जमाफी करायची असती, तर ती त्यांनी गेल्या अधिवेशनातच करून घेतली असती. विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करणारी शिवसेना तेव्हा झोपली होती का, असा सवालही विखे पाटील यांनी केला. (प्रतिनिधी)
‘तूरखरेदीवरून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका’
शेतकरी कर्जमाफीच्या निवेदनाऐवजी शिवसेना मंत्र्यांनी स्वत:चे राजीनामे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जायला हवे होते. शेतकरी कर्जमाफी झाली नाही, तर राजीनामा देण्याची भाषा शिवसेनेने यापूर्वीच केली होती, याची आठवणही विखे-पाटील यांनी करून दिली.